बीड : आघाडी सरकारच्या काळात मराठवाड्यात जलसंधारणाची शाश्वत कामे झाली नाही. त्यामुळे जनतेला मोठ्या कष्टांचा सामना करावा लागला. आमच्या सरकारने दुष्काळ हटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. येत्या काळात वॉटर ग्रीड योजना मराठवाडाभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.येथे सीना-मेहकरी उपसा जलसिंचन योजनेचा लोकार्पण सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री पंकजा मुंडे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, आ. भीमराव धोंडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, माजी आ. साहेबराव दरेकर, बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे, राम खाडे यांची उपस्थिती होती.फडणवीस म्हणाले, गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉटर ग्रीड योजना राबवून नंदनवन केले होते. याच धर्तीवर आता मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याबरोबर शेती व उद्योगांसाठी या योजनेच्या माध्यमातून योग्य ते नियोजन केले जाणार आहे. मराठवाड्यातील रस्ते व पाण्यासाठी ४९ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. यातून विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री मुंडे, मंत्री शिंदे, शिवतारे यांची भाषणे झाली. आ. धोंडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
वॉटर ग्रीड योजना
By admin | Published: October 11, 2016 12:45 AM