औरंगाबाद : लॉकडाऊन पूर्णतः की, अंशतः किंवा दुकान उघडण्यास काही तास परवानगी आहे की नाही, या संभ्रमात मंगळवारी व्यवसायाची वाट लागली आहे. व्यापाऱ्यांना ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी कोट्यवधीच्या उलाढालीवर पाणी सोडावे लागले.
वर्षभर बाजारपेठेत उलाढाल होत असली, तरी साडेतीन मुहूर्तावर नवीन खरेदी करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.
त्यात साडेतीन मुहूर्तांपैकी पाहिले व पूर्ण मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा होय. वर्षात गुढीपाडवा, दसरा व दिवाळी पाडव्याच्या दिवशी सर्वाधिक उलाढाल होत असते. नवीन वर्षाची सुरुवातही याच गुढीपाडव्याने होते. मागील वर्षी गुढीपाडवा लॉकडाऊनमध्ये आला व यंदा अंशतः व पूर्णतः लॉकडाऊन या सरकारी घोळात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. कोणी म्हणाले की, पूर्णतः लॉकडाऊन लावण्याच्या आधी दोन दिवस दुकाने उघडण्यास सवलतची मागणी मान्य झाली, त्यामुळे व्यापाऱ्यांनी सकाळी दुकाने उघडली, पण मनपाच्या पथकाने येऊन काही व्यापाऱ्यांना दंड ठोठावला. त्यामुळे दुकाने पुन्हा बंद झाली.
वाहनांच्या शोरूम, कापड मार्केट, सराफा मार्केट, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आज पूर्णतः बंद होते. जालना रोडवरील काही इलेक्ट्रॉनिक दुकानदारांनी दुकानाचे शटर अर्धे उघडे ठेवून विक्री सुरू केली होती. अशीच परिस्थिती जवाहर कॉलनीत सराफा व्यापाऱ्यांची होती.
दुकान उघडले, तर पावती मिळेलही भीती त्या व्यापाऱ्यांच्या मनात होतीच. जी दुकाने उघडी होती तिथे ग्राहक नसल्याचे दिसून आले.
गुढीपाडव्याला वाहन बाजारात धूम असते. नवीन सुमारे ५०० चारचाकी तर २००० ते २५०० दुचाकी विक्री होत असतात. सराफा बाजारात दिवसभरात ५ ते ८ कोटींची उलाढाल होत असते. ८०० च्या जवळपास टीव्ही, फ्रीज, २ हजार मोबाईल, कुलर विकली जातात. या कोट्यवधींच्या उलढालीवर व्यापाऱ्यांना आज पाणी सोडावे लागले. लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या नवीन घरात राहण्यास जाता आले नाही.
फक्त गुढीपाडव्यानिमित्त पूजेच्या साहित्याला मंगळवारी सकाळी मागणी होती.
चौकट
सहकुटुंब उभारली गुढी
लॉकडाऊन व गुढीपाडव्याच्या सुट्टीमुळे शहरवासीयांनी घरातच राहणे पसंत केले. गुढी उभारताना सहकुटुंब हजर होते. गुढीच्या तयारीसाठी महिलावर्गात पहाटेपासून लगबग सुरू झाली होती. अनेकांनी सकाळी सूर्योदय होताच गुढी उभारली, आरती केली. पारंपरिक वेशभूषेत नववर्षाचे स्वागत करण्यात आले. काहींनी लगेच गुढीसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला.
फोनवरच एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.