लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ६.०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मांजरा प्रकल्प क्षेत्रात दहा मिलिमीटर पाऊस पडला आहे. केज परिसरात पडलेल्या पावसामुळे केजडी नदीला पूर आला होता. मांजरा प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ४८० मिलिमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, गुरुवारी झालेल्या पावसामुळे मांजरा प्रकल्पात ०.८ दलघमी नवीन पाणीसाठा झाला आहे. सद्यस्थितीत मांजरा धरणात २६.१० दहा टक्के जिवंत पाणीसाठा आहे. प्रकल्पात चांगला साठा होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.
मांजरा प्रकल्पात थोडे वाढले पाणी.....मांजरा प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ४८० मिलिमीटर पाऊस पडला असून, यातून २० दलघमी नवीन पाणी यंदाच्या पावसाळ्यात आले आहे. सध्या धरणात ४६.१८६ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. म्हणजे २६.१० टक्के जिवंत पाणीसाठा आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या दहा मिलिमीटर पावसामुळे चार सेंटिमीटरने धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे.
गतवर्षी १५ ऑक्टोबरला भरले होते धरण.....गतवर्षी मांजरा प्रकल्पात सरासरी साडेसातशे ते आठशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. दरम्यान, १५ ऑक्टोबरला धरण भरले होते. त्यामुळे यंदाही परतीच्या पावसावर धरण भरेल अशी आशा आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत एक-दोन मोठे पाऊस झाल्यास धरण भरू शकते, असा पूर्वानुभव आहे.
मांजरावरील दोन्ही अपर प्रकल्प रिकामेच.....मांजरा धरणाच्या वर दोन छोटे प्रकल्प आहेत. ते अद्याप भरले नाहीत. त्यामुळे वरून पाण्याचा येवा नाही. प्रकल्प क्षेत्राच्या आजूबाजूला पडलेल्या पावसावरच यंदा मांजरा प्रकल्पात नव्याने २० दलघमी पाणी आले आहे.