पैठण (औरंगाबाद ) : गेल्या तीन दिवसांत धरणाच्या जलसाठ्यात ६ टक्के वाढ झाली असून, धरणाचा जलसाठा मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी आता फक्त ३.५ टीएमसी पाण्याची गरज आहे. गेल्या २४ तासांत धरणात १.८१ टीएमसी पाण्याची भर पडली आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील धरणातून सोमवारपासून वाढविण्यात आलेला विसर्ग आजही कायम आहे. गोदावरी दुथडी भरून वाहत असल्याने मंगळवारी दुपारनंतर जायकवाडी धरणात येणारी आवक वाढत आहे. सायंकाळी ४ वाजता धरणात २९१६९ क्युसेक क्षमतेने पाणी दाखल होत होते. मध्यरात्रीनंतर आवक ४०,००० क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली. जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्याला काल पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे नाशिकातील धरण समूहातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. आज दारणा धरणातून ९२५४ क्युसेक, गंगापूर धरणातून ८८३३ क्युसेक, कडवा धरणातून ७७६ क्युसेक, पालखेड धरणातून २८१० क्युसेक असा विसर्ग सुरू होता.
नांदूर-मधमेश्वर वेअरमधून सोमवारपासून गोदावरी पात्रात सुरू असलेला विसर्ग आजही ५०,०६५ क्युसेकने सुरू होता. गोदावरी पात्रात मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदीला दोन दिवसांपासून पूर आलेला आहे. जायकवाडी धरणाच्या वर असलेल्या वैजापूर तालुक्यातील नागमठाण बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात मंगळवारी सायंकाळी ४०,००० क्युसेक विसर्ग होत होता. हे पाणी मंगळवारी रात्री आठनंतर जायकवाडी धरणात दाखल होईल, असे जायकवाडीचे धरण अभियंता संदीप राठोड यांनी सांगितले. जायकवाडी धरणात २९१६९ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. सायंकाळी धरणाची पाणीपातळी १४९२.११ फूट अशी झाली होती. धरणात एकूण जलसाठा ६६७.३९४ दलघमी एवढा झाला आहे. धरण मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी १००.७१२ दलघमी ( ३.५ टीएमसी) पाण्याची गरज आहे. धरणाचा जलसाठा-४.६३ टक्के झाला आहे.
( तहानलेल्या मराठवाड्यासाठी गोदामायने घेतली धाव )
४० हजार क्युसेकपेक्षा जास्त आवक अपेक्षित गेल्या दोन दिवसांपासून नांदूर-मधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात ५० हजार क्युसेकपेक्षा जास्त क्षमतेने विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरणाच्या वर नागमठाण येथील सरिता मापन केंद्रावर गोदावरी मंगळवारी सायंकाळी ४० हजार क्युसेक क्षमतेने वाहती होती. गोदावरीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ नोंदविली जात असल्याने मंगळवारी रात्री ८ वाजेनंतर धरणातील आवक ४० हजार क्युसेकपेक्षा जास्त होईल, अशी माहिती जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली.