लातूर : लातूर जिल्ह्यातील पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाअंतर्गत जानेवारीमध्ये करण्यात आलेल्या १०९ विहिरींतील सर्वेक्षणावरून गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत ३.२९ मीटरने पाणीपातळीत घट झाली असल्याचे समोर आले आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक ४.४९ मीटरने पाणीपातळी घटली आहे. अहमदपूर तालुक्यातील १५, औसा १५, चाकूर ७, लातूर १८, निलंगा १७, शिरूर अनंतपाळ ५, रेणापूर ११, उदगीर ९, जळकोट ४, देवणी ८ अशा एकूण १०९ विहिरींचे सर्वेक्षण भूजल सर्वेक्षण विभागाअंतर्गत करण्यात येते. दर तीन महिन्याला सर्वेक्षण केले जात असल्यामुळे किती मीटरने पाणीपातळीत घट झाली, हे लक्षात येते. गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत औसा तालुक्यात २.७८, चाकूर तालुक्यात ३.६०, लातूर तालुक्यात ३.४९, निलंगा २.८३, शिरूर अनंतपाळ २.८१, रेणापूर २.६४, उदगीर ३.२७, जळकोट ४.४२, देवणी २.५२ तर अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक ४.४९ मीटरने पाणीपातळीत घट झाली आहे. सरासरी जिल्ह्याच्या पाणीपातळीत ३.२९ मीटरने घट झाली आहे. दिवसेंदिवस पाणी पातळी खोल जात असल्याने विंधन विहिरींचे पाणीही गायब होत आहे. (प्रतिनिधी)
३.२९ मीटरने घटली पाणीपातळी
By admin | Published: February 17, 2016 12:18 AM