छत्रपती संभाजीनगर : गुरुवारी मध्यरात्री १ वाजता शहरात अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अडीच तासांहून अधिक वेळ संततधार पाऊस सुरू होता. मध्यरात्री झालेल्या पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने तब्बल ४९.३ एवढी केली. ऐन पावसाळ्यातही अशा पद्धतीने पाऊस झाला नव्हता. अवकाळी पावसाने शहर परिसरातील नद्या, ओढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. हर्सूल तलावात तब्बल तीन फुटांनी पाणीपातळीत वाढ झाली.
पावसाळ्यात यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला. त्यामुळे तलाव, धरण, नद्यांमध्ये जेमतेम पाणी होते. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार, असे वाटत होते. चार दिवसांपूर्वी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार विशेषत: रात्रीच पाऊस धो-धो कोसळत आहे. गुरुवारी रात्री जोरदार सरी कोसळल्या. अडीच तास संततधार सुरू होती. शहराच्या सखल भागाला तळ्याचे स्वरूप आले. हर्सूल, मयूर पार्क इ. भागांतील विविध वसाहतींमध्ये पाण्याचे तळे साचले होते. महापालिकेच्या वाॅर्ड अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली.
भाजप कार्यालयात पाणीकाही ठिकाणी पाणी शिरल्याने नागरिकांनी अग्निशमन विभागाकडे तक्रारी केल्या. सिडको एन-४ भागातील संत गाडगेबाबा चौकात घरात पाणी शिरले. उस्मानपुरा येथे भाजप कार्यालयाच्या तळघरात पावसाचे पाणी शिरले. पदमपुरा येथील अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पाणी काढले. मध्यरात्री झालेल्या पावसाची चिकलठाणा वेधशाळेत ४९.३ मिलिमीटर एवढी नोंद झाली आहे.
नदी-नाले तुडुंबदोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने हर्सूल तलावाची पाणीपातळी एक फुटाने वाढली होती. गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने तलावाची पाणीपातळी तब्बल ३ फुटांनी वाढली. २८ फूट हर्सूल तलावाची क्षमता आहे. शुक्रवारी सायंकाळी तलावात १९ फूट पाणी होते. हर्सूलच्या पाण्यावर शहरातील तब्बल १४ वॉर्डांची तहान भागते. यंदा उन्हाळ्यापर्यंत पुरेल, एवढे पाणी तलावात आले आहे.
विंधन विहिरींना पाणीयंदा पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शहर आणि परिसरातील विंधन विहिरी कोरड्या पडल्या होत्या. अवकाळी पावसाने भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाली. अनेक विंधन विहिरी शुक्रवारी सुरू झाल्या.