छत्रपती संभाजीनगर : शहरातील पाणीप्रश्नावर यापूर्वी अनेकदा खंडपीठात चर्चा झाली. महापालिकेने शपथपत्र सादर करून शहराला पाच दिवसांआड पाणी देण्याची हमी दिली. काही महिने अंमलबजावणीही झाली. अलीकडे यामध्ये खंड पडला असून, सध्या आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. दररोज पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडचणी निर्माण होतात, त्यामुळे पाणीपुरवठ्याचा दिवस, वेळ पुढे ढकलण्यात येते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक पाणीप्रश्नावर मेटाकुटीला आले आहेत.
एखाद्या वसाहतीत एक दिवस उशिराने पाणी आले तर त्या भागातील राजकीय मंडळी, नगरसेवक आंदोलनाचे शस्त्र उपसत असत. आता तर पाणी आले काय गेले काय? कोणालाच काही देणेघेणे राहिलेले नाही. जुलै, ऑगस्ट महिन्यांत जायकवाडी, फारोळा येथे वारंवार तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. दोन आठवडे उलटल्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. पाचव्या दिवशी ज्या वसाहतींना पाणी मिळायला हवे, ते मिळत नाही. लाईनमन व्यवस्थित उत्तर देत नाहीत. अधिकारी फोन उचलत नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. पाणीप्रश्नाला शहरवासीय कमालीचे वैतागले आहेत.
हा पाहा विस्कळीतपणा१. एकनाथनगर उस्मानपुरा - ७ दिवसांआड२. टीव्ही सेंटर परिसर - ८ दिवसांआड३. सिडको-एन-२ - ६ दिवसांनंतर पाणी४. आरेफ कॉलनी - ७ दिवसांआड५. रशीदपुरा - ६ दिवसांनंतरच७. गणेश कॉलनी - ८व्या दिवशी पाणी८. टिळकनगर, विश्वभारती कॉलनी - ५ दिवसांनंतर९. संजयनगर, भवानीनगर - ८ दिवसांनंतर१०. बायजीपुरा - ८व्या दिवशी