लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी-तीसगाव रस्त्यावरील सिडको उद्यानाजवळ रविवारी (दि.१५) पाण्याची पाईपलाईन फुटली. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. या ठिकाणी ग्रामपंचायत व सिडकोची पाईपलाईन असल्याने नेमकी कोणाची पाईपलाईन फुटली हे समजू शकले नाही.वडगाव कोल्हाटी हद्दीतील सिडको अंतर्गत येणाऱ्या साईनगर, द्वारकानगरी, सार्थक हौ. सो. सारा कीर्ती आदी नागरी वसाहत भागाला पाणीपुरवठा करणारी सिडकोची पाईपलाईन येथून गेली आहे, तर याच ठिकाणी ग्रामपंचायतीची सुद्धा पाईपलाईन आली आहे.रविवारी सकाळी सिडको उद्यानाजवळ जय मल्हार चौकात पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने या ठिकाणी कारंजे उडाल्यासारखे पाण्याचे फवारे हवेत उडत होते. सुटीचा दिवस असल्याने याकडे ना ग्रामपंचायत ना सिडको प्रशासनाचे कोणीच फिरकले नाही. त्यामुळे नेमकी कोणाची पाईपलाईन फुटली याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, बराच वेळ पाणी पाणी रस्त्यावरून वाहत होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे, तर दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र वाळूज महानगरात पाहावयास मिळत आहे.
सिडको उद्यानाजवळ जलवाहिनी फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 1:20 AM