- स.सो.खंडाळकर
पाणी हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न. त्यातल्या त्यात पाण्याच्या बाबतीत मराठवाडा आणि नगर-नाशिकचे भांडण दरवर्षी बघावयास मिळते. नीरा-भीमा स्थिरीकरणातून मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी आणि कोकणचे पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल का? अशी प्रसिद्ध जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे यांच्याशी साधलेला हा संवाद...
प्रश्न : कृष्णा खोऱ्यातून किती पाणी मराठवाड्याला मिळू शकते?प्रा. पुरंदरे : सात टीएमसी पाणी मिळू शकेल. एकूण २५ टीएमसी पाणी मिळायला हवे. त्यापैकी सात टीएमसी पाण्यासाठी ५०० कोटी रु. खर्चही झाले आहेत; पण १८ टीएमसी पाणी मिळण्याची शक्यता कमी होत आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी कृष्णा खोऱ्यातून २५ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी खूप प्रयत्न केले होते; पण नेहमीप्रमाणे नोकरशाही आडवी आली. त्यांनी यात खो घालून ठेवला. सात टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळू शकेल, असे आता सांगता येऊ शकेल.
प्रश्न : यात काय राजकारण घडतेय..? प्रा. पुरंदरे : मोठे राजकारण घडतेय. विजयसिंह मोहिते पाटील हे आता भाजपमध्ये चालले आहेत. त्यामागे हे पाण्याचेच राजकारण आहे. नीरा-भीमा स्थिरीकरणातून एकूण ५६ टीएमसी पाणी उजनीला मिळायला हवे आणि त्यापैकी २५ टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्याला मिळायला हवे. बारामतीच्या पाण्याचे प्रकरणही उद्भवलेय, ते यातूनच.
प्रश्न : आणखी काय उपाययोजना करायला हव्यात? प्रा. पुरंदरे : मराठवाड्यातील कालव्यांची स्थिती वाईट आहे. मराठवाड्यातही समन्यायी पाणीवाटप व्हायला हवे.वैतरणेचे पाणी सध्या मुंबईला जाते. ते मराठवाड्याकडे वळवणे सहज शक्य नाही. त्यासाठी फार मोठे राजकीय प्रयत्न करावे लागतील, असा इशाराही ते आताच देऊन ठेवत आहेत. तांत्रिक दृष्टीने वैतरणेचे पाणी मराठवाड्याकडे वळवणे शक्यही आहे. पाटबंधारे महामंडळाच्या प्रस्तावानुसार प्रवाही पद्धतीने पाणी वळवता येऊ शकेल.
कोकणचे पाणी वळवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीयजे लोक नाशिक-नगरमधून मराठवाड्याला पाणी मिळू देत नाहीत, ते लोक कोकणचे पाणी मराठवाड्याकडे वळू देतील काय? मला तरी कोकणचे पाणी मिळण्याची शक्यता तशी कमीच वाटते. वैतरणेतून ३९ टीमएसी पाण्यासाठी लिफ्ट करावे लागणार नाही; पण काही योजनांसाठी लिफ्ट करावे लागेल. मात्र, पर्यावरणवादी त्याला आक्षेप घेतील.