पैठण : पैठण शहरात मंगळवारी सायंकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहराला दोन तास झोडपून काढले. अतिक्रमणामुळे बाधित झालेले शहरातील मोठे नाले तुंबून बसस्थानक, भाजी मार्केट, नारळा, कावसान आदी भागातील दुकानात व घरात पाणी घुसले. बसस्थानक परिसरातील नाथ कॉम्प्लेक्समधील दुकानात पाणी घुसून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने एका व्यापाऱ्याचा रक्तदाब वाढल्याने त्यास तातडीने रुग्णालयात हलवावे लागले. दरम्यान, नगर परिषदेचे पथकही भरपावसात तुंबलेल्या पाण्याची वाट मोकळी करण्यासाठी झटत होते.
सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पैठण शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. तोच रात्री आठ वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. पावसाने शहरातील भाजी मार्केट, बसस्थानक व कावसान परिसरातील मुख्य नाले भरभरून वाहत होते. दरम्यान, बसस्थानक परिसरात नाल्यावरील अतिक्रमणामुळे दुकानात पाणी घुसले. झालेले नुकसान पाहून तेथील एक व्यापारी ढसाढसा रडला. अचानक व्यापाऱ्याचा रक्तदाब वाढल्याने त्यास रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, नगर परिषदेचे अशोक पगारे, अश्विन गोजरे यांचे पथक पाणी काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कार्यरत होते. नेहमीच पाणी घुसून नुकसान होत असल्याने मुख्य नाल्यावर करण्यात आलेले अतिक्रमण नगर परिषद प्रशासनाने काढावे, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.