पैठण : तालुक्यात आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली असून, ३३ गावांमध्ये ६२ टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पैठण तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे जमिनीतील पाणीपातळी कमालीची घटली आहे. परिणामी विहीर व हातपंपांचे पाणी कमी होत आहे. शिवाय नदी, नाल्यांना पाणी नसल्याने व विविध प्रकल्पांमधील पाणीसाठा घटल्याने आतापासूनच पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार तालुक्यातील आडुळ बुद्रुक, आडुळ खुर्द, अंतरवाली खांडी, ब्राह्मणगाव तांडा, गेवराई मर्दा, गेवराई बुद्रुक, गेवराई खुर्द, अब्दुल्लापूर, होनोबाची वाडी, एकतुनी, रजापूर, थापटी तांडा, आडगाव जावळे, कडेठाण खुर्द, ब्राह्मणगाव, दाभरूळ, दरेगाव, देवगाव, देवगाव तांडा, डोणगाव, टेकडी तांडा, खादगाव, तुपेवाडी, तुपेवाडी तांडा, चिंचाळा, मिरखेडा, केकत जळगाव, हर्षी बुद्रुक, चौंढाळा, हर्षी खुर्द, जामवाडी तांडा, रांजणगाव, दांडगा, सानपवाडी अशा ३३ गावांमध्ये ६२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शिवाय ३ गावांमध्ये खासगी विहिरीचे प्रशासनाने अधिग्रहण केले आहे. फेब्रुवारी माहिन्यात आणखी काही गावांची यात भर पडणार आहे. जानेवारीअखेरीसच पाणीटंचाई जाणवत असल्याने एप्रिल, मे महिन्यांत पाणीटंचाईची तीव्रता किती असेल, असा प्रश्न ग्रामस्थांना पडून लागला आहे.
प्रस्ताव आल्यास टँकर सुरू करणार : चव्हाणयाबाबत तहसीलदार सारंग चव्हाण म्हणाले, सध्या तालुक्यात ३३ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखी काही गावांनी टँकरची मागणी केल्यास संबधित गावांचे सरपंच व ग्रामसेवकांनी याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. संबंधित गावांची पाहणी करून परिस्थिती गंभीर असेल तर टँकरने पाणीपुरवठा केला जाईल.