लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी जिल्ह्यात अद्याप सर्वदूर दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील ३१ गावे व १५ वाड्यांना ३६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा होत आहे.जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा जिल्ह्यास यंदा चांगला फायदा झाला. त्यामुळे गतवर्षी उन्हाळ्यात सहाशेवर गेलेली टँकरची संख्या या वर्षी १२५ पर्यंत पोहचली. यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने वेळेवर हजेरी लावली. परंतु बदनापूर, मंठा, परतूर, जालना तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक गावातील शासकीय पाणी पुरवठ्याच्या विहिरी कोरड्या पडल्याने तिथे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे टँकर सुरू करण्यात आलेले आहेत. जालना तालुक्यात ९ गावे व ६ वाड्यांवर, भोकरदन तालुक्यात दहा गावे, दोन वाड्यांवर २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.जाफराबाद तालुक्यात दोन गावे, परतूरमध्ये एक, मंठ्यात दोन, अंबडमध्ये पाच तर घनसावंगी तालुक्यात नऊ गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात ३६ टँकरच्या माध्यमातून ९६ फेऱ्या पूर्ण केल्या जात आहे. अपुऱ्या पावसामुळे आणखी काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा करण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यात ४६ गावांत पाणीटंचाई
By admin | Published: June 28, 2017 12:40 AM