औरंगाबाद : २० हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, निपटनिरंजन परिसरात मागील अनेक दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. या भागातील काही कॉलन्यांमध्ये, तर दोन महिन्यांपासून पाणीच आले नसल्याची धक्कादायक माहिती पाहणीत समोर आली. यात विशेष म्हणजे निपटनिरंजन येथील पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या मुख्य लाईनला १० पेक्षा अधिक बायपास प्रशासनाच्या आशीर्वादाने देण्यात आले असल्यामुळे पाण्याची टाकी कधीच भरत नाही. यामुळे या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
औरंगाबाद शहरातील सर्वात पुरातन परिसर म्हणून बेगमपुऱ्याची ओळख आहे. थत्ते हौदामुळे या भागात अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचे संकट आलेले नव्हते. मात्र, मागील दोन महिन्यांपासून प्रशासनाची हलगर्जी आणि काही भागातील लोकांनी मुख्य लाईनलाच दिलेल्या बायपासमुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ज्या कॉलनीमध्ये मुख्य लाईनला बायपास दिला आहे. त्या भागात मात्र पाण्याची चंगळ असल्याची माहिती नागरिकांनी दिली.
बेगमपुरा, घाटी आणि विद्यापीठ परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी घाटी, विद्यापीठ आणि निपटनिरंजन येथे तीन पाण्याच्या टाक्यांची उभारणी केलेली आहे. या तिन्ही टाक्यांना ज्युबली पार्क येथील जक्शनमधून पाणीपुरवठा केला जातो. यातील घाटी आणि विद्यापीठातील टाक्या जवळ आहेत. या टाक्यांमध्ये पाणी व्यवस्थितपणे चढते. मात्र, निपटनिरंजन येथील पाण्याची टाकी उंचावर असून, त्याठिकाणी प्रेशर दिल्यानंतर पाणी चढते. मात्र, या टाकीकडे जाणाऱ्या मुख्य लाईनला बेकायदा बायपास देत चाळणी केली आहे.
महापालिकेचा अधिकारी चिरीमिरी घेऊन काही विशिष्ट कॉलनीतील लोकांनाच थेट मुख्य लाईनला बायपास देत असल्यामुळे टाकीत पाणीच पडत नाही. टाकीत चार मीटरपर्यंतच पाणी पडले तरच सर्व भागांना समान पाणीपुरवठा होऊ शकतो. मात्र, टाकीत पाणीच जात नसल्यामुळे हजारो नागरिकांना पाण्याविना तडफडावे लागत आहे. बेगमपुरा चौक, कुंभारगल्ली, तळेश्वर कॉलनी, श्रीकृष्ण मंदिर, साई मंदिर याठिकाणी मुख्य लाईनला बायपास दिला असल्याचे पाहणीत आढळून आले. बायपास दिलेल्या कॉलनीमध्ये पाण्याची चंगळ असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
या भागात पाण्याचा ठणठणाट
सतपालनगर, न्यू पहाडसिंगपुरा, पहाडसिंगपुरा, जैस्वाल प्लॉटिंग, गुरुगणेशनगर, रेणुका हौसिंग सोसायटी, अमोदी हिल, इब्राहीम शहा कॉलनी, जयसिंगपुरा, विद्युत कॉलनी या भागात पाण्याचा ठणठणाट आहे.
पाणी टँकरचा धंदा जोरातमागील दोन महिन्यांपासून सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे पाण्याच्या टँकरचा धंदा जोरात सुरू आहे. पैसे देऊनही पाण्याचे टँकर मागविल्यानंतर सुद्धा लवकर पाणी मिळत नसल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. टँकरच्या लॉबीचे उखळ पांढरे होण्यासाठीच महापालिकेचे अधिकारी पाणीपुरवठा सुरळीत करत नसल्याचा संतापही नागरिकांनी व्यक्त केला.
मुख्य लाईनला आशीर्वादमुख्य लाईनला अनेक जणांनी बायपास घेतला आहे. हा बायपास नगरसेवक आणि महापालिका प्रशासनाच्या संगनमताने मिळालेला आहे. या भागात राहणाऱ्या २० हजार लोकांच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या प्रशासन आणि नगरसेवक विशिष्ट लोकांचेच हित जोपासत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
ऐतिहासिक थत्ते हौद बनला क्रिकेट मैदानशहराच्या ऐतिहासिक वारशामध्ये मोलाची भर घालणाऱ्या बेगमपुऱ्यातील थत्ते हौदाची पाणी नसल्यामुळे प्रचंड दुरवस्था झालेली आहे. तीन वर्षांपासून कोरडाठाक असलेला हा हौद आता परिसरातील मुलांचे क्रिकेट खेळण्याचे ठिकाण बनला असल्याचे पाहावयास मिळाले. औरंगाबाद हे नहरींचे शहर म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. या शहरात उगमापासून शेवटपर्यंत सुस्थितीत असलेली थत्ते नहर ही एकमेव नहर होती. पिढ्यान्पिढ्या या हौदाने बेगमपुरा परिसरातील नागरिकांची तहान भागवली. १९७२ च्या दुष्काळतही या हौदाला पाणी होते. या दुष्काळाच्या दुसऱ्याच वर्षी थत्ते कुटुंबाने हा हौद केंद्रीय पुरातत्व विभागाकडे वर्ग केला. पुरातत्व विभागानेही हा हौद राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित होण्याची शक्यता असल्यामुळे त्याची देखभाल केली.पुढे केंद्रीय पुरातत्व विभागाने २००७ मध्ये थत्ते हौद संरक्षित करण्यासाठी नोटीस काढली. ही नोटीस हौदावर डकवताच बेगमपुऱ्यात खळबळ उडाली. हौद राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झाल्यास परिसरातील निवासी मालमत्तांना धक्का लागणार असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी खा. चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून निघालेली नोटीस रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. २०१३ मध्ये केंद्रीय पुरातत्व विभागाचे मंत्री महेश शर्मा यांनी आदेश देत थत्ते हौदाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याविषयीची नोटीस मागे घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे थत्ते कुटुंबातील सदस्य अनंतराव थत्ते यांनी खंडपीठात याचिका दाखल करीत थत्ते हौद राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी केली.
या याचिकेचा अद्यापही निर्णय झालेला नाही. मात्र, मागील तीन वर्षांपासून केंद्रीय पुरातत्व विभागाने थत्ते नहरीच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे थत्ते हौदातील पाणी बंद झाले आहे. याचा परिणाम बेगमपुऱ्यातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. थत्ते हौदात नहरीवर येणारे पाणी बंद झाले आहे. या नहरीवर जयसिंगपुऱ्यासह इतर भागात नागरिकांनी बांधकाम केले आहे. याच्या परिणामी नहर बुजली आहे. या नहरीचे पुनर्निर्माण केल्याशिवाय पाणी येण्याची शक्यता नाही. यामुळे बेगमपुऱ्यातील थत्ते हौदात पाणी येत होते. हा इतिहास झाल्याचेच स्पष्ट झाले आहे.