औरंगाबाद : मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठा सात दिवसांत पाच टक्क्यांनी वाढला आहे. ११ जुलै रोजी १२.४४ टक्के पाणीसाठा होता. बुधवारी पाणीसाठा १७.२२ टक्क्यांवर पोहोचला. मराठवाड्यात धरणांत सध्या २६०९.८० दलघमी इतके पाणी आहे.
पावसाळा सुरू होऊन महिना उलटला. मोठ्या खंडानंतर गेल्या सात दिवसांत ठिकठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे मराठवाड्यातील धरणांतील पाण्यात वाढ झाली आहे. गेल्या सात दिवसांत निम्न दुधना प्रकल्पात १४.४३ टक्क्यांवरून १५.१८ टक्के (१३९.३६ दलघमी), येलदरी प्रकल्पात १२०.३१ वरून १२१.४३ दलघमी, सिद्धेश्वर प्रकल्पात १४५.६८ वरून १५३.९३ दलघमी, माजलगाव धरणात ०.१९ वरून २.४४ टक्के (१४९.६० दलघमी), मांजरा धरणात ६.२६ वरू न ६.०९ टक्के (५७.८७ दलघमी), सीना कोळेगाव प्रकल्पात ६६.४८ वरून ६५.२९ दलघमी पाणीसाठा झाला आहे. तर निम्न मनार प्रकल्पात ९.८० टक्के (२२.२५ दलघमी), निम्न तेरणा प्रकल्पात ४२.१८ टक्के (६८.४५दलघमी) पाणीसाठा आहे.
जायकवाडीत वाढजायकवाडी धरणात ११ जून रोजी २३.४१ टक्के पाणीसाठा होता. ११ जुलै रोजी हा पाणीसाठा १९.३० टक्क्यांवर आला होता. अवघ्या महिनाभरात ४.११ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट झाली. नाशिक जिल्ह्यातील पावसाने अखेर जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाली. बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत २१.६० टक्के इतका पाणीसाठा झाला.
‘विष्णूपुरी’ ८० टक्के भरलामागील तीन दिवसांपासून नांदेड आणि परिसरात सुरू असलेला भीजपाऊस आणि पूर्णेतून होत असलेली पाण्याची आवक यामुळे बुधवारी सकाळी ९ वाजता विष्णूपुरी प्रकल्प ८० टक्के भरला आहे. विष्णूपुरीतील पाणी साठ्यामुळे नांदेड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. विष्णूपुरीची ८० दलघमी उपयुक्त पाणीसाठा क्षमता असून सद्य:स्थितीत या प्रकल्पात ६० दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दिग्रस, अंतेश्वर प्रकल्पातून पूर्णेत पाणी येते आणि तेथून पाण्याचा प्रवाह विष्णूपुरीमध्ये दाखल होतो. प्रकल्पाच्या वरील भागात होत असलेल्या मोठ्या पावसामुळे विष्णूपुरीत पाण्याची आवक वाढली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या ४२.५४ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांतही समाधानाचे वातावरण आहे. बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत नांदेड- ५.६३, मुदखेड- १२.६७, अर्धापूर- १९.३३, भोकर- १०.७५, उमरी- १७.३३, लोहा- ००.५०, किनवट- १.५७ तर हदगाव, धर्माबाद तालुक्यात प्रत्येकी एक मि.मी. पाऊस झाला आहे.