वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बिघडल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
सध्या गावातील मंगलमूर्ती कॉलनी, हरिओमनगर या भागात चार ते पाच तर भारतनगर, ऋषिकेशनगर व जुन्या गावात दोन दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. गावात बहुतांश कामगारवर्ग वास्तव्यास असून, कंपनीतून काम केल्यानंतर नागरिकांना पाण्यासाठी उशिरापर्यंत जागरण करावे लागत आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याकडे तक्रारी करुनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अनेक वसाहतींतील नागरिक टँकरचे पाणी विकत घेऊन तहान भागवित आहेत. या भागातील जलसाठेही दुषीत झालेले असल्यामुळे हातपंप व बोअरचे पाणीही आरोग्यास अपायकारक असल्यामुळे या पाण्याचा वापर नागरिक करीत नाही.
येथील ग्रामपंचायत सक्षम असूनही गावात सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. गावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा संघराज धम्मकिर्ती, अमृत डोंगरदिवे, संजय खणके, सय्यद जमील, रवी पवार, प्रकाश ससाणे आदींनी दिला आहे.