वाळूज महानगर: सिडको वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने हाल होत असून, नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.
या भागातील देवगिरीनगर, साईनगर, जिजामाता नगरला काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. शिवाय पाण्याची वेळही निश्चित नाही. काही नागरिकांना केवळ ४-५ हांडे पाणी पुरवठा होत आहे. अनेकदा नागरिक कामाला गेल्यावर पाणी येत असल्याने अनेकांना पाणी मिळत नाही. या भागातील हातपंप बंद पडल्याने पाण्याची पर्यायी व्यवस्थाही नाही. पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे.
बऱ्याचदा पैसे देवूनही वेळेवर टँकर मिळत नाही. पाण्यासाठी हाल होत असल्याने नागरिकांना बजाजनगर परिसरातून नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून सायकल, दुचाकीवरुन पाणी आणावे लागत आहे. पाणीटंचाईमुळे येथील रहिवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सिडको प्रशासनाने या भागाला सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्रस्त छाया कुकलारे, नंदा काळे, प्रभावती नित्ते, कविता हंडोरे, दीक्षा इंगोले, पुजा कुकलारे, रेश्मा शेरे, सुवर्णा कांबळे, गयाबाई वाघ आदी महिलांनी केली आहे.