पेठसांगवी : उमरगा तालुक्यातील पेठसांगवी या गावचा पाणीपुरवठा मागील तीन दिवसांपासून बंद आहे. पाणी योजनेच्या पंपाला वीज पुरवठा करणाऱ्या दोन्ही डीपी जळाल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.पेठसांवगी या गावातील कुटुंबसंख्या अकराशेवर आहे. सदरील लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने कुपनलिका घेतल्या आहेत. या बोअरला दोन डीपीवरून कनेक्शन घेण्यात आले आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी एक डीपी जळाला होता. तो अद्याप दुरूस्त केलेला नसतानाच गुरूवारी पुन्हा पेठसांगवी शिवारातील डीपी जळाला आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून पेठसांगवी येथे निर्जळी आहे. सदरील दोन्ही कनेक्शनचे लाखो रूपये वीज बिल थकित आहे. पेठसांगवी शिवारारातील कनेक्शनचे १ लाख ४४ हजार ३३ रूपये तर होळी फिडरवरील कनेक्शनचे १ लाख ४४ हजार ७९ रूपये थकित आहेत. तसेच अन्य एका मोटारीचे ४८ हजार ५०० रूपये वीज बिल थकित आहे. लाखो रूपये वीजबिल थकित असल्याने वीज कंपनीकडून नवीन डीपी देण्यास असमर्थता दर्शविल्याने ग्रामपंचायतीची चांगलीच पंचाईत झाली आहे. काही तरी रक्कम भरल्याशिवाय नवीन डीपी दिला जाणार नाही, अशी भूमिका वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे ही रक्कम भरण्यासाठी आता ग्रामपंचायतीला कर वसुलीवर भर दिल्याशिवाय गत्यंतर नाही. ही बाब ओळखूनच ग्रामस्थांनी घरपट्टी तातडीने भरावी, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे. (वार्ताहर)
पेठसांगवीचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून ठप्प !
By admin | Published: September 13, 2014 11:30 PM