छत्रपती संभाजीनगर : शहराचा पाणीपुरवठा अगोदरच विस्कळीत असताना बुधवारी सायंकाळी मोठे संकट उभे राहिले. नक्षत्रवाडी येथे १४०० मिमी व्यासाची जलवाहिनी कंत्राटदाराच्या जेसीबीमुळे फुटली. यानंतर लगेच अर्ध्या तासानंतर जायकवाडीत वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशनमध्ये मोठा स्पार्क झाल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला. युद्धपातळीवर दोन्ही ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असले तरी गुरुवारी पोळ्याच्या दिवशी नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागेल.
पहिले संकटशहराची तहान भागविण्यासाठी ७०० आणि १४०० मिमी व्यासाच्या दोन जलवाहिन्या आहेत. बुधवारी दुपारी ४:३० वाजता नक्षत्रवाडी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नेमलेल्या श्रीहरी असोसिएट कंपनीचे कर्मचारी ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करीत होते. मनपाच्या मोठ्या जलवाहिनीला जेसीबीचा धक्का लागल्याने एअर व्हॉल्व्ह फुटला. मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाऊ लागले. त्वरित जायकवाडी येथून पंपिंग बंद केले गेले. जलवाहिनी रिकामी केल्यानंतर रात्री दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. आतापर्यंत चार वेळा कंत्राटदारांनी मनपाची जलवाहिनी फोडली आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी बराच मोठा कालावधी लागणार असल्याची शक्यता असल्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलले जाईल, असे महापालिका पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले.
दुसरे संकटनक्षत्रवाडी येथील जलवाहिनी दुरुस्तीचा विषय डोळ्यासमोर असताना ४:५५ वाजता जायकवाडी पाणीपुरवठा केंद्राच्या विद्युत सबस्टेशनमधील केबलमध्ये स्पार्क होऊन संपूर्ण पंपिंगच बंद पडले. या घटनेची माहिती त्वरित महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन केबल दुरुस्तीचे काम सुरू केले. रात्री उशिरापर्यंत हे कामही सुरू होते. मध्यरात्री हे काम पूर्ण झाल्यावर जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी सुरू होईल.
तिसरे संकटशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही योजना बुधवारी दुपारी ४:३० वाजेपासून बंद आहेत. त्यामुळे शहरात पाणी आणण्याचे काम पूर्णपणे बंद आहे. मध्यरात्री किंवा पहाटे शहरात पाणी आले तरी जलकुंभ भरण्यास विलंब लागेल. गुरुवारी पोळ्याच्या दिवशी नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागेल. मंगळवारी दुपारी अडीच तास फारोळा जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा अगोदरच विस्कळीत झालेला आहेच.