जालना : महावितरणने वीजबिलाचा भरणा न करणाऱ्या थकबाकी असलेल्यांविरोधात मोहीम राबवून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तीव्र केली आहे. जिल्ह्यातील १०८ पाणीपुरवठा जोडण्यांची वीज खंडित केल्याने पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. दरम्यान, जालना पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेची वीज खंडित करण्यासाठी शुक्रवारी पथक आले होते. मात्र, महावितरणकडे चाळीस लाखांचा भरणा केल्याने पुरवठा खंडित केला नसल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसह ग्रामपंचायत पाणी पुरवठ्याच्या १०८ वीज जोडण्यांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे ११ कोटी ७६ लाख रूपयांची थकबाकी आहे. घनसावंगी तालुक्यातील मुडेगाव, घोणसी, घोणसीतांडा, निपाणी, पिंपळगाव, साकळगाव या गावातील वीज ग्राहकांची वसुली कमी असल्याने पुरवठा खंडित करण्यात आला. जालना शहर पाणी पुरवठा योजनेचीही थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, दोन दिवसांपूर्वी चाळीस लाख रूपये थकबाकीपोटी भरल्याचे मुख्याधिकारी खांडेकर यांनी सांगितले.तसेच सात वीज जोडण्यांचा पुरवठा बंद तोडला. त्याचबरोबर अंबड पाणी पुरवठा योजनेच्या उच्च दाब ग्राहक वर्गवारीतील १३ लाख रूपयांची थकबाकी आहे.तेथील वीज तोडण्यात आली आहे. घनसावंगी पाणीपुरवठा योजनेची सुमारे चार लाख ५० हजार रूपयांची थकबाकी आहे. यासोबतच जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचाही थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. थकबाकी भरल्याशिवाय पुरवठा करणार नसल्याचा पवित्रा महावितरणने घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा कधी सुरू होईल, असा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)
पाणीपुरवठा योजनांची वीज तोडली
By admin | Published: February 05, 2017 11:36 PM