वाळूज महानगर: साजापूरात काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. क्रांतीनगरसह परिसरातील रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने टँकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे. मात्र, तो पुरेसा नसल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. परिसरात टँकरच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी केली जात आहे.
साजापूर ग्रामस्थांना ग्रामपंचायतीकडून आठवड्यातून एकदा तोही कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. येथील क्रांतीनगर व इतर भागात पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. शिवाय टँकरही येत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना तर वसाहतीतील विहिरीत मोटारी टाकून पाणी घ्यावे लागत आहे. मोटारी टाकण्यावरुन नागरिकांमध्ये अनेकदा वादाच्या घटना घडत आहेत.
गावचा पाणीप्रश्न लक्षात घेवून सरपंच अंकुश राऊत, उपसरपंच रऊफ शेख यांनी ग्रामपंचायतीतर्फे गावाला ३ टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. पण गावच्या लोकसंख्या अधिक असल्याने टँकरचे पाणी कमी पडत आहे. टँकरच्या फेऱ्या वाढविल्यास पाण्याची समस्या सुटू शकेल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.