जालना : जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक वाड्या, वस्त्यांमध्ये हंडाभर पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. ४१९ गावे व ७४ वाड्या मिळून ४९१ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर ५७ लघु व ७ मध्यम प्रकल्प मिळून केवळ ३ टक्के जलसाठा आहे. आठ तालुक्यांतील ४१९ गावे व ७४ वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गतवर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे विहिरी व कूपनलिका एप्रिल महिन्यातच कोरड्या पडल्या. काही ठिकाणी जेमतेम पाणी होते तेही उन्हाचा पारा ४० अंशांवर गेल्याने तेही आटले. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरीभागातही तीव्र पाणीटंचाई आहे. अनेक गावात विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. विशेष म्हणजे जुई, पद्मावती आदी मोठे प्रकल्प कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर असल्याने आगामी काळात जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ५७ लघू प्रकल्पांत फक्त १ टक्के पाणीसाठा आहे. तर सात मध्यम प्रकल्पांत ७ टक्के पाणीसाठा आहे. दोन्ही प्रकल्प मिळून केवळ ३ टक्के जलसाठा आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी तीनची पाणी पातळी जोत्याखाली आहे. मध्यम प्रकलप एकही कोरडाठाक पडलेला नाही. ५७ लघू प्रकल्पांपैकी तब्बल ४२ प्रकल्प कोरडेठाक आहेत. १० प्रकल्पातील पाणी पातळी जोत्याखाली आहे. लहान मोठे प्रकल्प आटल्याने परिसरातील पशुधन धोक्यात आले आहे. शेतकरी तसेच पशुपालकांना जनावरे जगविणे जिकिरीचे बनले आहे. पाणीच नसल्याने काहींनी पशुधनाची विक्री सुरू केली आहे. कल्याण गिरजा मध्यम प्रकल्पात १२ टक्के, कल्याण मध्यम प्रकल्पात पाणी पातळी जोत्याखाली, अप्पर दुधना प्रकल्प २७ टक्के, जुई मध्यम प्रकल्प १ टक्के, धामणा मध्यम प्रकल्प पाणी पातळी जोत्याखाली, जिवरेखा मध्यम प्रकल्प पाणी पातळी जोत्याखाली, गल्हाटी मध्यम प्रकल्प १ टक्के पाणीसाठा आहे. बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकलप वगळता एकाही प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.
४९१ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा
By admin | Published: May 03, 2016 12:56 AM