वाळूज महानगर : वडगावला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे काही पाईप बदलण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. मात्र, त्याच मापाचे पाईप मिळत नसल्याने काम रखडले आहे. परिणामी गावाचा दोन दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल सुरु आहेत. पैसे देवूनही टँकर मिळत नसल्याने नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी परिसरात पायपीट करावी लागत असल्याने चित्र आहे.
गावाला पाणीपुरवठा करणाºया मुख्य जलवाहिनीला पोलीस आयुक्तालय मैदाना समोरील नाल्यात गुरुवारी गळती लागली होती. ही बाब निदर्शनास येताच ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा बंद केला. तसेच जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. परंतु पाईप जीर्ण झाल्याने दुरुस्ती करणे अशक्य झाले. परिणामी ग्रामपंचायतीने नवीन पाईप टाकण्याचा निर्णय घेतला. परंतू जलवाहिनीच्या मापाचा पाईप मिळत नसल्याने शुक्रवारी सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम बंदच होते.
ग्रामपंचायतीकडून जलवाहिनी दुरुस्ती कामास दिरंगाई केली जात असल्याने दोन दिवसांपासून गावचा पाणीपुरवठा बंद आहे. गावात तीव्र पाणीटंचाई सुरु असून, एक ते दीड किलोमीटर पायपीट करुन पाणी आणावे लागत आहे. दुरुस्तीचे काम कधी पूर्ण होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही.
यासंदर्भात सरपंच उषा साळे म्हणाल्या की, ग्रामपंचायतीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पण जलवाहिनीच्या साईजचे पाईप व साहित्य मिळत नसल्याने दुरुस्तीस विलंब होत आहे. शनिवारी दुपारनंतर गावाचा पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.