वाळूज महानगर : छावणीकडून पंढरपूरच्या दिशेने येणारा पाण्याचे रिकामे टँकर उलटल्याने दोनजण जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी साऊथसिटी चौकाजवळ घडली.
छावणी येथून सोमवारी कलीम वॉट सप्लायर्स नावाचे पाण्याचे रिकामे टँकर (एमएच- १७, सी- ७०५०) औरंगाबाद-नगर महामार्गाने पंढरपूरच्या दिशेने येत होते. दुपारी अडीच वाजेच्या येत असताना गोलवाडी फाटा व साऊथसिटी चौकाच्या मध्ये अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्याच्या खाली खड्ड्यात जाऊन उलटले. या घटनेत टँकरचालकासह अन्य एकजण जखमी झाला आहे.
नागरिकांनी जखमींना टँकरच्या बाहेर काढले. त्यांना खाजगी वाहनातून शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमींची नावे समजू शकली नाहीत. यावेळी टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने टँकर चालकाने पुढील धोका टाळण्यासाठी टँकर रस्त्याच्या खाली घातले. त्यामुळे टँकर पलटी झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकरणी सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली नसल्याचे पोलीसांनी सांगितले.