औरंगाबाद : राज्य शासनाने सातारा-देवळाई नगर परिषद बरखास्त करून हा भाग मनपात समाविष्ट करण्याची अधिसूचना जारी केली. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा नगर परिषदेचे दप्तर ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सोबतच या भागातील इमारतींना मालमत्त कर, पाणीपट्टी लावण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या. दरम्यान, पुढील व्यवस्था होईपर्यंत जिल्हा प्रशासनाने सातारा-देवळाईतील पाणीपुरवठ्याचे टँकर सुरूच ठेवावेत, अशी विनंती मनपाच्या वतीने करण्यात आली आहे. प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी त्याबाबतचे एक पत्र जिल्हाधिकारी निधी पांडे यांना दिले. आधी नगर परिषद, नंतर मनपा, पुन्हा नगर परिषद असा प्रवास केल्यानंतर बुधवारी अखेर सातारा-देवळाईतील नागरिकांची अधांतरी अवस्था संपली. शासनाने अंतिम परिपत्रक काढून नगर परिषद बरखास्त केली, तसेच हा भाग मनपात समाविष्ट केला. त्याचे अधिकृत आदेश आज सायंकाळी मनपात येऊन धडकले. त्यानंतर लगेचच प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी निधी पांडे यांना पत्र लिहून नगर परिषदेचे दप्तर ताब्यात देण्याची मागणी केली. नगर परिषदेच्या आस्थापनेवरील सर्व ४३ कर्मचारी मनपाकडे वर्ग करावेत, नगर परिषदेचे दप्तर आणि नगर परिषदेकडे जमा असलेला निधी मनपाच्या स्वाधीन करावा, असेही पत्रात म्हटले आहे. सद्य:स्थितीत जिल्हा प्रशासनाकडून सातारा-देवळाई भागात पाणीपुरवठ्याचे टँकर सुरू आहेत. पुढील व्यवस्था होईपर्यंत जिल्हा प्रशासनाने हे टँकर सुरूच ठेवावेत अशी विनंती प्रभारी आयुक्तांनी केली आहे. सातारा-देवळाई भागातील मालमत्तांना आता लवकरच कर लावण्यात येणार आहे़ तसेच मनपाकडून टँकरने पाणीपुरवठा सुरू झाल्यावर पाणीपट्टीही आकारली जाणार आहे.
पाणीपट्टी, मालमत्ता कर लावण्याच्या हालचाली
By admin | Published: January 22, 2016 12:12 AM