जायकवाडीत जलपर्यटन, तर हिंगोलीत कृषी संशोधन केंद्र; जाणून घ्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 04:15 PM2022-03-11T16:15:27+5:302022-03-11T16:16:26+5:30
मराठवाड्यासाठी पर्यटन, कृषी, आरोग्य या क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यात मराठवाड्यासाठी पर्यटन, कृषी, आरोग्य, उर्जा या क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद येथील पर्यटन वृद्धीवर भर देत जायकवाडी येथे जलपर्यटन सुरु होणार आहे तर वेरूळ-अजिंठा या जागतिक पर्यटन स्थळांच्या विकासासाठी अनुदान देण्यात आले आहे. तर हिंगोली येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा अर्थसंकल्पात अजित पवार यांनी केली. यासोबतच जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यासाठी ६० कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे.
मराठवाड्यासाठी ठळक घोषणा :
Ø देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक, अशा एकूण तीन मोबाईल प्रयोगशाळा
Ø नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा येथे प्रत्येकी ५० खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट उभारणार.
Ø हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली , सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर ,रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन करणार.
Ø जालना येथे 365 खाटांचे नवीन प्रादेशिक मनोरूग्णालय स्थापन करण्याकरीता 60 कोटी रुपये उपलब्ध करणार
Ø मौजे कौडगाव व मौजे शिंदाळा (जि.लातूर), मौजे साक्री (जि.धुळे), वाशीम, मौजे कचराळा (जि.चंद्रपूर) आणि यवतमाळ येथे एकूण ५७७ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प, राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पार्क.
Ø औरंगाबाद येथील अमृतमहोत्सवी वंदे मातरम् सभागृहांकरीता 43 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
Ø मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष कार्यक्रमासाठी 75 कोटी रुपये.
Ø कोयना,जायकवाडी व गोसीखुर्द येथे जल पर्यटन प्रकल्प प्रस्तावित
Ø जव्हार जि.पालघर, फर्दापूर जि.औरंगाबाद, अजिंठा,वेरूळ,महाबळेश्वर व लोणावळा येथे पर्यटन विकासाकरीता सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान.