औरंगाबाद : जायकवाडीचे पाणी पळविण्याचा उद्योग गुरुवारीदेखील कायम राहिला. ओझर बंधाऱ्यातून पाण्याच्या विसर्गात गुरुवारी ४५७ वरून १४७६ क्युसेकपर्यंत वाढ झाली; परंतु याठिकाणी डाव्या कालव्यातून होणारा विसर्ग थांबलेला नव्हता. त्यामुळे जायकवाडीला पाणी कधी आणि किती पोहोचणार, याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भंडारदऱ्यातून १ हजार ५७४ क्युसेकने निळवंडेत पाणी सोडून, निळवंडेतून बुधवारी २ हजार क्युसेकने जायकवाडीला पाणी सोडण्यात आले. निळवंडेचा हा विसर्ग गुरुवारीही कायम होता. ओझर बंधाऱ्यातून बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जायकवाडीसाठी अवघ्या ४५७ क्युसेकचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे नेवासामार्गे जायकवाडीपर्यंत पाणी पोहोचण्याविषयी साशंकता व्यक्त करण्यात आली. या दिवशी डाव्या कालव्यातून ८०५, तर उजव्या कालव्यातून ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. यामध्ये सायंकाळी उजवा कालव्यातील विसर्ग बंद करण्यात आला; परंतु डाव्या कालव्यातील विसर्ग गुरुवारीही कायम होता. या कालव्यातून ८५० क्युसेकने विसर्ग सुरू होता.
ओझर बंधाऱ्यातून बुधवारच्या तुलनेत गुरुवारी जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ झाली. सायंकाळपर्यंत १४७६ क्युसेकने विसर्ग सुरूहोता. हा विसर्ग पाहता आता जायकवाडीला कधी आणि किती पाणी पोहोचणार,याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. कालव्याला सोडण्यात आलेल्या पाण्यासह ठिकठिकाणी पाण्याच्या चोरीच्या शक्यतेने जायकवाडीला पोहोचणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात घट होण्याची भीती आहे. दरम्यान, ओझर बंधारा येथील सुरूअसलेला कालवा गुरुवारी रात्री बंद होणार आहे. त्यामुळे निळवंडेतील पाणी ओझर बंधारामार्गे शुक्रवारी नेवासा येथे पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नेवाशाला आज पोहोचणार
ओझर बंधारा येथील सुरू असलेला कालवा गुरुवारी रात्री बंद होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी पाणी पोहोचेल,असे लाभक्षेत्र विकास प्राधिक रणाचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले.
निळवंडेतून १.८० टीएमसीयापूर्वी नियोजित पाणी सोडण्यापूर्वीच निळवंडेतून विसर्ग थांबविण्यात आला होता. केवळ रबी हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पाण्यामुळे (रोटेशन) जायकवाडीचे पाणी अडविण्यात आले होते. हे रोटेशन संपल्यानंतरच म्हणजे बुधवारपासून निळवंडेतून पुन्हा विसर्ग झाला. निळवंडेतून १.८० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे; परंतु पाणी वळविण्याच्या प्रकारामुळे जायकवाडीत अपेक्षित पाणी पोहोचणार नसल्याचे दिसते.
आतापर्यंतची परिस्थितीनगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडीत ८.९९ पैकी किमान ६ टीएमसी पाणी येणार होते. प्रत्यक्षात वरच्या भागात पाणी चोरीने जायकवाडी धरणात केवळ ३.८० टीएमसी पाणी पोहोचले आहे. प्रत्यक्षात २.२० टीएमसी पाणी आलेले नाही. जायकवाडीसाठी ५ नोव्हेंबरपर्यंत ७.४७ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला होता. निळवंडेतून येणाऱ्या पाण्यानंतरही ६ टीएमसीचा पल्ला गाठणे अवघड दिसते.