छत्रपती संभाजीनगर : एकीकडे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरू असताना दुसरीकडे मात्र त्याच प्रकल्पात पाणी नसल्याचे कारण देत गंगापूर, वैजापूर तालुक्याला पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना कळविले आहे.
नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून एक्स्प्रेस कालव्याद्वारे गंगापूर, वैजापूर आणि कोपरगाव तालुक्यांतील काही गावांना पाणीपुरवठा होतो. गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे वैजापूर, गंगापूर तालुक्यांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून उन्हाळी आवर्तन सोडावे, अशी मागणी केली होती. याविषयी कडाचे अधीक्षक अभियंता, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना निवेदन दिले होते. मात्र, निवेदनाची दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी वैजापूर येथील नांदूर मधमेश्वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढून उपोषण सुरू केले होते.
सोमवारी कार्यकारी अभियंता आर. ए. गुजरे यांनी उपोषणकर्त्यांना पत्र दिले. यात नमूद केले की, नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून देय असलेल्या ३११८ घनफूट पाण्यापेक्षा अधिक पाणी देण्यात आले आहे. आता प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा असल्याने पाणीपुरवठा करणे शक्य नाही, असे कळविले. तसेच ३ मेरोजी कार्यकारी संचालकांनी पाणी सोडण्याबाबत शासनास निर्णय घेण्याचा प्रस्तावाद्वारे कळविल्याचे सांगितले.
उपोषणकर्ते आधार शेतकरी जलदूत समितीचे पंडित शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘नांमका’तून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कालव्याद्वारे पाणी दिले जात असताना दुसरीकडे मात्र मुद्दाम आम्हाला पाणी नाकारले जात आहे. दरवर्षी उन्हाळी पिकांना पाणी दिले जाते, म्हणून आम्ही फळबागा लावल्या, भाजीपाल्याचे पिके लावली आता पाणी नाकारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. शिवाय जनावरांच्या चारा, पाण्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे.