वाळूज महानगर : सिडको नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीसह अंतर्गत जलवाहिनीलाही अनेक ठिकाणी गळती लागली आहे. साऊथसिटी येथील जलवाहिनीला अनेक दिवसांपासून गळती सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
हा प्रकार निदर्शनास आणूनही याच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने दररोज शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.सिडको परिसरातील अनेक नागरी वसाहतींना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दररोज शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र सिडको परिसरात पहावयास मिळत आहे. सिडको महानगर २ च्या प्रवेशद्वाराजवळच साऊथसिटीसह म्हाडा कॉलनी परिसराला पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीला अनेक दिवसांपासून गळती लागलेली असून, सद्यस्थितीत गळतीचे प्रमाण वाढले आहे.
गळतीमुळे बाजूलाच पाण्याचे मोठे डबके साचले आहे. विशेष म्हणजे येथून सिडकोच्या अधिकाºयांसह कर्मचारी अनेकवेळा ये-जा करतात. परंतू या गळतीकडे कोणीच लक्ष देत नाही. या गळतीमुळे नागरी वसाहतीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. जलकुंभात कमी पाणीसाठा होत असल्याने अनेक नागरी वसाहतींना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, अनेकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. प्रशासनाने सुरु असलेली जलवाहिनीची गळती बंद करुन होणारी पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी रहिवाशांमधून केली जात आहे.सिडकोचे उप अभियंता दीपक हिवाळे म्हणाले की, दुरुस्त केलेली जलवाहनी काही उपद्रवी लोक पुन्हा फोडत आहेत. जलवाहिनीची दुरुस्ती करुन गळती तात्काळ थांबविली जाईल.