छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी आहे. पावसाचा मोठा खंड असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील सर्व धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा आहे. जायकवाडीत ५० टक्क्यांपेक्षा कमी तर माजलगाव प्रकल्पात केवळ १४ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार नाही. वरच्या बाजूच्या मोठ्या धरणात सरासरी ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. जायकवाडी व माजलगाव प्रकल्पासाठी वरच्या धरणातून पाणी साेडावे. या मागणीसाठी १२ ऑक्टोबरपासून किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
परभणी जिल्ह्यात जायकवाडी प्रकल्पाचे लाभक्षेत्र पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा तालुक्यात आणि माजलगाव प्रकल्पाचे लाभक्षेत्र सोनपेठ गंगाखेड तालुक्यात अस्तित्वात आहे आणि वरील तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान आहे. जायकवाडी प्रकल्प कायमचा मोडीत काढण्याच्या हेतूने जायकवाडी प्रकल्प कर्मचारी संख्या कमी केली आहे. कालवे दुरुस्तीचा प्रस्ताव अद्याप तयारदेखील करण्यात आलेला नाही. मराठवाड्याला ४७ हजार कोटींचा निधी दिल्याच्या वल्गना करताना जायकवाडी प्रकल्पाचे व माजलगाव प्रकल्पाचे कालवे दुरुस्तीसाठी एका रुपयाचीही शासनाने तरतूद केली नाही. २०८ किमी पैठण डावा कालवा अत्यंत कमजोर झालेला असून सदर कालव्याची स्थापित वहन क्षमता साखळी किमी १२२ वरील सीआर येथे ३३०० क्युसेक क्षमता असताना केवळ ८०० ते ९०० क्युसेक क्षमतेने चालविला जातो.
किसान सभेच्या मागण्यासमन्यायी पाणीवाटपाबाबत न्यायालयीन तरतुदी व मजनिप्रा कायद्यानुसार जायकवाडी प्रकल्पासाठी २० टीएमसी व माजलगाव प्रकल्पासाठी ५ टीएमसी पाणी वरच्या धरणातून सोडावे.जायकवाडी आणि माजलगाव प्रकल्पातील लाभक्षेत्राच्या संपूर्ण क्षेत्रासाठी रब्बी व उन्हाळी १२ पाणी पाळ्या उपलब्ध करा. जायकवाडी प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीसाठी प्रलंबित २५०० कोटी रुपयांचा निधी तातडीने द्या. या व इतर मागण्यांसाठी किसान सभेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे.