वाळूज महानगर : वाळूज येथे ग्रामनिधीतून ४८ लाख रुपये खर्च करुन नवीन ७ लाख लिटर क्षमतेचा जलुकंभ उभारण्यात येणार आहे. जलकुंभाच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर करण्यात आले. या जलकुंभामुळे गावात सुरळीत पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे.
वाळूज गावाचा पाणी प्रश्न तीन दशकांपासून गाजत असून, नागरिकांना बाराही महिने भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी दशकभरापूर्वी पाच कोटी रुपये खर्चाची राष्टÑीय पेयजल योजना राबविण्यात आली. मात्र, टेंभापुरी मध्यम प्रकल्पात जलसाठा होत नसल्यामुळे या योजनेवर झालेला निधी पाण्यात गेला आहे.
दिवंगत सरपंच सुभाष तुपे व ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर वर्षभरापूर्वी एमआयडीसी प्रशासनाने वाळूजला पाणी पुरवठा करण्यास मंजुरी दिली. तसेच ग्रामपंचायतीने नवीन जलवाहिनी व जलकुंभ उभारण्यासाठी ग्रामनिधी, क्लस्टर व १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ६५ लाख रुपये खर्च करुन ४ मीटरची ६ इंच व्यासाची जलवाहिनी टाकली आहे.
एमआयडीसीकडून ग्रामपंचायतीला दररोज जवळपास १४ लाख लिटर पाणी पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. वर्षभरापासून गावात एमआयडीसीचा पाणी पुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. एमआयडीसीकडून येणारे पाणी रामराईरोडवरील जलकुंभात साठवून गावात पाणी पुरवठा करण्यात येतो.
मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत हा जलकुंभ अपुरा ठरत असल्यामुळे सरपंच पपीन माने, उपसरपंच मनोज जैस्वाल, ग्रामविकास अधिकारी एस. सी.लव्हाळे व सदस्यांनी नवीन जलकुंभ उभारण्याचा निर्णय घेतला होता. कार्यक्रमाला माजी सभापती ज्ञानेश्वर पा.बोरकर, सदस्य अनिल साळवे, लक्ष्मणराव पा.पाठे, रवी मनगटे, संजय शिंदे, हापीज पटेल, नंदु सोनवणे, पोपट बनकर, सिद्धेश्वर ढोले, उत्तम बनकर, चेअरमन सर्जेराव भोंड, शरदचंद्र अभंग, ज्ञानेश्वर देसाई,ताजु मुल्ला, रोहित श्रीमाळी, अस्लम शेख, महेश पवार आदी उपस्थित होते.