औरंगाबाद : जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी गुरुवारी सकाळी रेल्वेस्टेशन रोडवर एचएससी बोर्डसमोर फुटली होती. तब्बल चार दिवस रात्रंदिवस सुरु असलेले महापालिकेचे जलवाहिनी जोडण्याचे काम रविवारी पहाटे पाच वाजता पूर्ण झाले. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता शहरात पाणी येण्यास सुरुवात झाली.
रेल्वे स्टेशन रोडवर जलवाहिनी सिमेंट रस्त्याच्या खालून घेतलेली आहे. अधूनमधून ही जलवाहिनी फुटत असल्यामुळे महापालिकेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारी सकाळी जलवाहिनी फुटली. जलवाहिनीचा एक मोठा तुकडा बदलावा लागणार होता. एवढा मोठा तुकडा महापालिकेकडे आणि शहरात कुठेच उपलब्ध नव्हता. धुळे येथे खास टीम पाठवून जलवाहिनीसाठी लागणारा लोखंडी तुकडा मागविण्यात आला. सिमेंट जलवाहिनीला लोखंडी तुकडा बसविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यांच्या मदतीने शुक्रवारी सायंकाळी काम सुरू झाले. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर रविवारी पहाटे पाच वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. चार दिवसांपासून जलवाहिनी बंद होती. त्यामुळे शहरात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर अगोदर टेस्टिंग करण्यात आली. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता शहरात पाणी आणण्याचे काम सुरू झाले. चार दिवसांपासून ज्या वसाहतींना पाणी देता आले नव्हते त्या वसाहतींना पाणी देण्याचे काम सुरू करण्यात आले. १४०० मि.मी. व्यासाची दुसरी स्वतंत्र जलवाहिनी सुरू होती. त्या जलवाहिनीचा आधार घेत जुन्या शहरातील काही पाण्याच्या टाक्यांवर पाणी पोहोचविण्यात येत होते. त्यामुळे शहरात पाण्याची प्रचंड ओरड झाली नाही.