औरंगाबाद : ‘या देशाचे खरे लढवय्ये आम्हीच. आम्ही लढत राहिलो म्हणून ‘कॅम्पा’त राहिलो, हे सांगायला सुरू केल्यास या देशात नवा ‘डिबेट‘ सुरू होईल, असे प्रतिपादन विश्वास वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.
प्रा. विष्णू जाधवलिखित ‘कंठुळी’ या आत्मकथनाचे प्रकाशन आंबेडकर यांच्या हस्ते विद्यापीठ नाट्यगृहात झाले. अध्यक्षस्थानी विचारवंत प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर होते. ‘याच मातीतल्या कलेनं, वाद्यानं बंडाचं निशाण फडकवलं आहे. कला विद्रोहाचं व्यासपीठ आहे. त्याचं नीट डाॅक्युमेंटेशन झालं नाही तर मोठे नुकसान होईल’, असा इशारा बाळासाहेबांनी दिला. हल्ली ‘सनातनी हिंदू धर्माचा विजय असो’, अशा घोषणा दिल्या जात आहेत, याकडे लक्ष वेधत बाळासाहेबांनी अतिरेकी आंबेडकरवाद्यांचाही समाचार घेतला. भटक्या-विमुक्त चळवळीचे दिवंगत नेते प्रा. मोतीराम राठोड यांचा उल्लेखही त्यांनी केला. लेखक विष्णू जाधव यांनी मनोगत मांडले. प्रकाशक प्रा. भारत शिरसाट यांनी भूमिका मांडली. प्रा. किशन चव्हाण व प्रा.डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी ‘कंठुळी’वर भाष्य केलं.
विष्णू जाधव व संजीवनी जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. समाधान इंगळे यांनी संचालन केले, तर अमरदीप वानखेडे यांनी आभार मानले. यावेळी कैकाडी समाजाच्या व्यथा-वेदनांना कैकाडी समाज अध्यक्ष एस. एल. गायकवाड, शिरीष जाधव, विकी जाधव, रोहिदास जाधव, संजय मेडे, अशोक जाधव, बाबा जाधव, गिरीश जाधव, नारायण जाधव यांनी वाट करून दिली. ज्ञानेश्वर जाधव, ॲड. लता बामणे, प्रभाकर बकले, नागसेन वानखेडे, संगीत कांबळे, वाल्मीक वाघ, आलमगीर खान, प्रज्ञा साळवे, सागर चक्रनारायण, अमित भुईगळ, प्रेषित मोरे, अशोक हिंगे, मुजफ्फर इनामदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.