छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शिक्षकांच्या पदांवर सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू झाली आहे. हजारो पात्रताधारक बेरोजगार नोकरीच्या शोधासाठी भटकंती करीत असताना त्यांच्या नेमणुका करण्याऐवजी ज्यांना मोठ्या प्रमाणात पेन्शन मिळते, त्यांच्या नियुक्तीचा घाट शासनाने घातला आहे. या निर्णयाला बेरोजगार युवकांसह शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. त्याचे पडसादही उमटण्यास सुरुवात झाली आहे.
महिन्याला २० हजार मानधनराज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्तीचा आदेश ७ जुलै रोजी काढला आहे. सदर आदेशानुसार ७० वर्षे वयापर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांना नेमणुका देता येणार आहेत. या सेवानिवृत्तांना २० हजार रुपये प्रतिमहिना मानधन देण्याचे आदेशात म्हटले आहे. सेवानिवृत्तांच्या नेमणुकीची प्रक्रिया पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचेही आदेशात म्हटले आहे.
जिल्ह्यात शिक्षकांच्या ७०० जागा रिक्तजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मागील वर्षीच्या संचमान्यतेनुसार जवळपास ७०० जागा रिक्त आहेत. त्यामध्ये यावर्षीच्या संचमान्यतेनुसार बदल होणार आहे. या जागांवर नेमणुकीसाठी हजारो पात्रताधारक बेरोजगार रांगेत उभे आहेत. त्यांना नोकरीची संधी मिळत नसतानाच सेवानिवृत्तांची नेमणूक केली जाणार आहे.
उपोषण करणार राज्याचे शिक्षणमंत्री ३० हजार शिक्षकांच्या भरतीची यादी ऑगस्टमध्ये लावणार असल्याची घोषणा करतात. त्याचवेळी मागच्या दाराने सेवानिवृत्तांची नेमणूक करण्याचा आदेश काढतात. या आदेशामुळे शिक्षक भरती होणारच नसल्याचे स्पष्ट होते. या विरोधात पुण्यातील शिक्षण आयुक्तालयासमोर १७ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत.-संतोष मगर, अध्यक्ष, डीटीएड, बीएड स्टुडंटस् असोसिएशन
अनेक जागा रिकाम्या सेवानिवृत्त शिक्षकांना नेमण्यासाठी निधीची आवश्यकता लागणार आहे. हा निधी कोठून उपलब्ध करायचा त्याविषयीचे मार्गदर्शन वरिष्ठ करतील. त्यानंतर रिक्त जागांवर नेमणुकीचा निर्णय होऊ शकतो. सध्या प्रत्येक तालुक्यात ५ ते ७ टक्के शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यानुसार सेवानिवृत्तांच्या नेमणुकीचा निर्णय घेतला जाईल.- जयश्री चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प.
युवकांची नेमणूक करावी
पात्रताधारक युवकांना संधी मिळाली पाहिजे. ते काम करू शकतात. युवकांच्या उत्साहाचा उपयोग विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठीच होईल. सेवानिवृत्त शिक्षक कामे करू शकणार नाहीत. त्यामुळे सेवानिवृत्तांपेक्षा युवकांचीच नेमणूक मानधन तत्त्वावर झाली पाहिजे.-प्रभाकर पवार, माजी निमंत्रित सदस्य, शिक्षण समिती