औरंगाबाद : शहरात दंगल सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत दोन समुदाय आमने सामने आले आणि जाळपोळ आणि जोरदार दगडफेक सुरू झाली. या दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलीस कमी पडल्याने शहर धुमसत राहिले, अशी स्पष्ट कबुली राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
औरंगाबादेत दंगल पेटल्याचे कळताच बिहारी यांनी शनिवारी सायंकाळी औरंगाबादेत धाव घेतली. त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. ज्या घरावर रॉकेलचे बोळे आणि दगड सापडले त्या घरांचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शहरातील दोन्ही समुदायातील जाणकारांशी चर्चा केली. रविवारी सकाळी सिटीचौक पोलीस ठाण्यात त्यांनी अधिकाऱ्यांकडून दंगलीचा आढावा घेतला. या बैठकीला प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त राहुल श्रीरामे, औरंगाबाद ग्रामीणच्या अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्या उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महासंचालक म्हणाले की, दंगलीच्या तत्कालीन कारणाशिवाय अन्य कारणेही असल्याचे समोर आले.
गांधीनगरातील तत्कालिक भांडण, महानगरपालिकेने अवैध नळ कनेक्शनविरोधात आणि रस्त्यावरील हातगाड्यांविरोधात सुरू केलेली कारवाईही यास कारणीभूत आहे. शासकीय यंत्रणेच्या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची खबरदारी घेण्यात येईल, त्याकरिता सर्व शासकीय यंत्रणेच्या अधिका-यांची बैठक लवकरच घेण्यात येणार आहे.
रात्री सुरू झालेली दंगल दुस-या दिवशी दुपारपर्यंत का नियंत्रणात आणता आली नाही, या प्रश्नाचे उत्तर देताना महासंचालक म्हणाले की, दंगलीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात पोलीस कमी पडले. दंगलीचा सामना करताना पोलिसांकडून मिळालेल्या रिस्पॉन्समध्ये गॅप होता. हा गॅप का निर्माण झाला आणि दंगल का चिघळली, याबाबत चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आले. शहर आता पूर्वपदावर आले असले तरी यापुढे अशी घटना घडू नये, यासाठी पोलिसांना जनसंपर्क वाढवून अलर्ट राहावे लागेल.