औरंगाबाद : आपण शिकलो-सवरलो; पण बुद्धिजीवी नाही बनलो. देशात एवढे मोठे षडयंत्र रचले जात आहे; पण त्यापासून आपण अनभिज्ञ राहत आहोत. आपण वर्तमानात जगत नाही. वर्तमानातूनच भविष्य बनत असते. भविष्यातून वर्तमान घडत नाही, असे मौलिक विचार शुक्रवारी येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.
बीड बायपास रोडवरील वासंती मंगल कार्यालयात शुक्रवारपासून सुरू झालेल्या बामसेफच्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. ‘सामाजिक परिवर्तन फुले-आंबेडकरी मिशनसे, या दिशाहीन आंदोलनसे?’ असा या सत्राचा विषय होता. सकाळी पू. भदन्त करुणाकर महाथेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर पहिले सत्र सुरू झाले.
पूज्य भदन्त खेमधम्मो महाथेरो यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.देशाला व संविधानालाही वाचवावयाचे आहे. कारण संविधान संपुष्टात आणण्याचे मोठे षडयंत्र रचले गेले आहे. याविरुद्धची लढाई प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लढाई लढावी लागेल, असे प्रतिपादन भदन्त खेमधम्मो यांनी केले, तर पू. भदन्त करुणाकर महाथेरो यांनी, प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राबाहेर पडावे. उत्तर प्रदेश त्यांची वाट पाहत आहे, असे साकडे घातले.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांची एनआरसी व सीएएबद्दलची रोखठोक भूमिका समोर आलेली आहे. आजही ते या मुद्यावर पोटतिडकीने बोलत होते. एनआरसी कायदा किती जणांना माहिती आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. उपस्थितांमधून अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. फक्त दोन-तीन जणांनी हात वर केले. हे पाहून प्रकाश आंबेडकर अवाक् झाले. मग हे अधिवेशन कशासाठी? इतिहासात रममाण होण्यासाठी, आत्मिक समाधानासाठी, बामसेफच्या कॅडर कॅम्पमधून नेते का तयार होत नाहीत, असे प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केले.
प्रारंभी, नेहा राव, सत्यप्रकाश बौद्ध व डॉ. जितेंद्र बौद्ध यांनी क्रांतिगीते गायिली. के. बी. दिवेकर यांनी प्रास्ताविक केले. बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष अतरवीरसिंह यांचेही यावेळी भाषण झाले.
बामसेफच्या मंचावर आंबेडकर कसे? बामसेफच्या मंचावर प्रकाश आंबेडकर कसे, अशी चर्चा आजही होत होती. यासंदर्भात बामसेफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष के. बी. दिवेकर यांनी सांगितले की, आम्ही यापूर्वीही बामसेफच्या मंचावर आंबेडकरांना आणले होते व ते आले होते. बामसेफचे अन्य गट प्रकाश आंबडेकर व भिक्खू संघालाही मानत नाहीत. आम्ही या दोघांनाही मानतो. त्यामुळे बामसेफच्या मंचावर आंबेडकरांचे येणे यात गैर काहीच नाही.