- अमेय पाठक
जालना:मराठा आरक्षणावर कोणत्या कोणत्या खासदाराने पाठिंबा दिला हे प्रसार माध्यमातून कळालं आहे. इथेच सगळे जण लढून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी खासदारांना केले. मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील भाषणापूर्वी अंतरवाली सराटी येथे जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात हे खरं आहे. आम्ही सरकारला सांगितलं आहे. देवस्थानामध्ये हजारो वर्षापूर्वीच्या कुणबी नोंदी आहेत. नायगाव आणि गेवराई या दोन तालुक्यात सांगितलं की कुणबी पुरावेच नाही. तसेच नांदेड, बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये नोंदी कमी आहेत. हे अधिकारी जाणून बुजून करताय. मी आरोपचं नाही करत तर तुम्हाला पुरावा देईल. 54 लाख हा आकडा पूर्ण महाराष्ट्रातला आहे. शिंदे समिती आणि सरकारने गैरसमज करू नये. शिंदे समितीचं काम सुरू राहू द्या आणि 24 डिसेंबर ला कायदा पारित करा, असे आवाहन जरांगे यांनी केले.
तसेच दोन महिने मागे पुढे झाले होतं आता नाही .सरकारने आता आमची बाजू समजून घ्यावी. तुम्हाला जनगणना करायची असेल तर आधी आम्हाला आत घ्या. जनगणना आणि टक्के वाढवण्याच्या राड्यात तुम्ही आम्हाला बाहेर राहू देणार. समाजाच्या लेकरांच्या खूप वेदना आहेत, त्या समजून घ्या. कापूस पण विकेना आणि मुलाला ही नोकरी लागेना. आणखी आम्ही सरकारला वेळ देत राहतो,मराठे आता नाही ऐकत असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला.
सरकारने विशेष अधिवेशन न घेता याच अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करावी. सरकारने आपला अधिवेशनाचा वेळ वाढवावा मात्र मराठा समाजाचा आरक्षणाच्या विषय 24 डिसेंबर पर्यंत मार्गी लावावा, अशी मागणी जरांगे यांनी केली. मराठा समाज आपल्या भूमिकेवर ठाम असून आम्हाला 24 डिसेंबर रोजी आरक्षण नाही मिळालं तर आम्ही आमची पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार. ते सरकारला परवडणार नसेल असा इशारा देखील जरांगे यांनी यावेळी दिला.