औरंगाबाद : ज्या रुग्णालयाकडे पुरेसे रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध आहेत, सध्या ती रुग्णालये श्रीमंत मानली जात आहेत. त्यादृष्टीने सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय या इंजेक्शनच्या बाबतीत श्रीमंतच म्हणावे लागेल. तर गोरगरीब रुग्णांचा आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयाची इंजेक्शनची जुळवाजुळव करताना त्रेधा उडते आहे. एप्रिल महिन्यात खासगी रुग्णालयांना उसणे इंजेक्शन देणाऱ्या घाटी रुग्णालयावर आता जिल्हा रुग्णालयाकडून रेमडेसिविर घेण्याची वेळ आली आहे.
राज्यभरात एप्रिल महिन्यात इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. अनेक शहरात इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना भटकंती करावी लागली. त्यावेळी घाटी रुग्णालयात मात्र महिनाभर पुरेल इतका साठा होता. इंजेक्शन लागत असेल तर रुग्णाला ५ दिवस घाटी रुग्णालयात दाखल करा, असेही घाटी प्रशासनाने जाहीर केले होते. मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण घाटीत दाखल होत आहे. यात अनेकांना रेमडेसिविरची गरज असते. घाटीत दाखल झाल्याने इंजेक्शनची सहज उपलब्धता होत गेली. इंजेक्शन पुरेसे उपलब्ध असल्याने घाटी प्रशासनाने काही खासगी रुग्णालयांना उसनवारीवर इंजेक्शनही पुरविले; परंतु आता घाटीलाही इंजेक्शनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागते आहे. रोज २५० ते ३०० इंजेक्शन याठिकाणी लागतात. इंजेक्शन कमी पडत असल्याने शुक्रवारी घाटी प्रशासनाने जिल्हा रुग्णालयाकडे ८०० इंजेक्शनची मागणी केली; पण जिल्हा रुग्णालयाकडून घाटीला २५० इंजेक्शन देण्यात आले. घाटी प्रशासनाकडून होत असलेल्या प्रयत्नांमुळे येथील रुग्णांची इंजेक्शनसाठी कोणतीही गैरसोय होत नाही.
पुरेसा साठा
घाटी रुग्णालयाने ८०० रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी होती. त्यांना २५० इंजेक्शन देण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात सध्या या इंजेक्शनचा पुरेशा प्रमाणात साठा आहे.
- डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक