औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसबरोबर ४२ जागांबाबत एकवाक्यता झाली आहे. काही जागांत अदलाबदल होईल. औरंगाबादच्या जागेसाठी आम्ही आग्रही असून, पक्षाला जागा सुटल्यास आमदार सतीश चव्हाण ती लढवतील, असे स्पष्ट विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केले.
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील मतदारसंघाबाबत आम्ही ५० टक्केजागा काँग्रेस पक्षाकडे मागितल्या आहेत. मी या चर्चेच्या प्रक्रियेत नाही. मात्र, काही जागांच्या अदलाबदलीसंदर्भात चर्चा चालू आहे. दोन्ही पक्षांच्या राज्यांतील नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा चालू आहे. मी या चर्चेत नाही. राज्यात २०१४ साली झालेल्या निवडणुकीत आमचे ४१, तर काँग्रेसचे ४२ आमदार निवडून आले. त्याचप्रमाणे काँग्रेसचे दोन खासदार, तर आमचे चार खासदार निवडून आले. त्यामुळे आमची शक्ती समान आहे. त्यामुळे लोकसभेच्या राज्यातील ५० टक्केजागांसाठी आम्ही आग्रही आहोत.
औरंगाबादची जागा गेल्या काही निवडणुकांपासून काँग्रेस पक्ष हरत आहे. यापूर्वी औरंगाबाद मतदारसंघातून साहेबराव डोणगावकर यांना मी निवडून आणले आहे. आता औरंगाबादच्या जागेसंबंधी सकारात्मक विचार होऊन फायद्याचा बदल होत असेल, तर ही जागा बदल करण्याचा आग्रह पक्षाचे राज्यपातळीवरील नेते करतील.
पुण्याची जागा नकोपुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडून मागून घ्यावा, असा आग्रह पक्षाचे काही नेते करीत आहेत. मात्र, जिल्ह्यातील चारही जागा आम्ही लढविल्या, तर काँग्रेसने काय करायचे, असा संवाल करीत खा. पवार यांनी पुणे मतदारसंघ काँग्रेसकडेच राहील, हे पुन्हा एकदा स्पष्ट केले.
हमारे पास सतीश हैऔरंगाबादची लोकसभेची जागा पक्ष मागणार आहे. मग त्यासाठी पक्षाकडे उमेदवार कोण आहे, असा प्रश्न विचारताच पत्रकार परिषदेत त्यांच्या शेजारी बसलेल्या आ. सतीश चव्हाण यांच्या पाठीवर थाप देत खा. पवार म्हणाले की, ‘हमारे पास सतीश है ना...’ मी अजून सतीश चव्हाण यांना विचारले नाही. मात्र, पक्षाने सांगितल्यास ते निवडणूक लढवतील, असे खा. पवार यांनी स्पष्ट केले.