छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाविरोधात सर्व राजकीय पक्षांतील ओबीसी नेते एकत्र झाले आहे, यावरून आरक्षण किती महत्वाचे आहे, हे मराठा नेत्यांनी लक्षात घ्यावे. आरक्षणाच्या लढाईत आपण एकटा पडलो असलो तरी समाजाची भक्कम साथ असल्याने ही लढाई शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा आणि कुणबी एकच आहेत, याविषयी शासनाने २० वर्षापूर्वी परिपत्रकही काढले होते. विविध सरकारी दस्तऐवजात कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. यामुळे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, एवढीच आपली मागणी आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सरकारने करावी. मराठा समाजाला सगेसोयऱ्याचा कायदा लागू करावा, या मागणीसाठी आपण राज्यसरकारला १३ जुलैपर्यंतची वेळ दिली आहे. मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर विश्वास असल्याने त्यांच्या आवाहनानुसार १३ जुलैपर्यंत एकाही नेत्याच्या टिकेला उत्तर देणार नसल्याचे जरांगे यांनी सांगितले. आपले आंदोलन भरकटल्याचे मंत्री विखे पाटील यांना कळते पण मराठा जातीचे असूनही समाजासाठी त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे त्यांना कळत नसल्याची टिका जरांगे यांनी विखे पाटील यांच्यावर केली.
मंत्री छगन भुजबळ यांचे पुण्यातील भाषण चिथावणीखोर पुणे येथे भाषण करताना मंत्री छगन भुजबळ यांनी तलवारी गंजल्या आहेत, घासून ठेवा, असे विधान करीत ओबीसी बांधवांना चिथावणी दिल्याचे आरोप जरांगे यांनी केला. त्यांना राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी अशा दंगली घडवायच्या असल्याचे यावरून दिसत आहे. मग आम्हीही शांत राहायचे का, मराठा समाजाने सावध राहावे, भुजबळांच्या तलवारीच्या भाषा गंभीर असल्याचे ते म्हणाले.
६ जुलैपूर्वी सर्व कामे आटोपूवन घ्या...६ ते १३ जुलैपर्यंतच्या आरक्षण जनजागरण शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ६ जुलैपूर्वी समाजबांधवांनी त्यांची कामे उरकून घ्यावी आणि या जनजागरण रॅलीत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे यांनी केले.