- संतोष हिरेमठऔरंगाबाद : नोकरी, शिक्षणामुळे उशिरा लग्न होण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, आई होण्यासाठी अनेक महिलांना अडचणींना सामोरे जावे लागते. शेवटी ज्यावेळी आई होण्याची आनंदाची बाब कळते, त्याच वेळी गर्भातील बाळात काही व्यंग असल्याचेही निदान होते; परंतु त्याची पर्वा न करता आई-बाबा होण्यासाठी व्यंग असलेले बाळ स्वीकारण्यास अनेकजण तयार होतात. बाळाच्या जन्मानंतर आम्ही वाट्टेल ते करून बाळाला बरे करू, अशी भूमिका घेत आहेत. ही सकारात्मक बाब आहे. मात्र, गंभीर व्यंग असेल तर गर्भपाताशिवाय पर्याय उरत नाही. त्यावेळी अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळतो.
गर्भ राहिल्यापासून बाळाचा जन्म होईपर्यंत त्याची वाढ, हालचाल बघणे हे सोनोग्राफीमुळे साध्य झाले आहे. नऊ महिन्यांच्या काळात तीन ते चार वेळेला सोनोग्राफी करतात व गरजेप्रमाणे जास्त वेळेसही सोनोग्राफी करावी लागते. यातून होणाऱ्या बाळाची शारीरिक वाढ अपूर्ण, काही अवयव कमी असणे अथवा जास्त असणे, पाय वाकडे असणे, आतडे, हृदय, मेंदूत दोष आदींची स्थिती समजते.
वर्षभरात ६० गर्भपातसमितीच्या परवानगीने २४ आठवड्यांच्या पलीकडेही गर्भपात करता येते. घाटीत वर्षभरात असे ६० गर्भपात झाले. अपूर्ण वाढ, हृदयाची गंभीर स्थिती आदी कारणांनी हे गर्भपात झाले.
योग्य वयात हवी गर्भधारणागर्भधारणेसाठी २० ते ३५ वर्षे हे वय अधिक योग्य. व्यंगावर उपचार असेल तर बाळ स्वीकारले जाते.- डॉ. अलका एकबोटे, जेनेटिक आजारतज्ज्ञ
३ टक्के बालकांचा जन्मसामान्यत: ३ टक्के बालके ही व्यंग घेऊन जन्माला येतात. अनेक व्यंग हे गरोदरपणाच्या २२ आठवड्यानंतर दिसतात. अधिक गंभीर व्यंग असेल तर कुटुंबीय गर्भपाताचा निर्णय घेतात. समितीच्या परवानगीने २४ ते २८ आठवड्यांतही गर्भपात करता येतो. घाटीत गेल्या वर्षभरात असे ६० गर्भपात करण्यात आले.- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी
सोनाेग्राफी महत्त्वपूर्णउशिरा विवाह झाल्याने गर्भात व्यंग राहण्याची शक्यता अधिक असते; परंतु अनेक कुटुंबीय असे बाळ स्वीकारतात. व्यंग असलेल्या गर्भामुळे आईला धोका असेल किंवा जन्मल्यानंतर ते जगू शकत नसेल तरच गर्भपात केला जातो. गर्भपातील व्यंगाचे निदान होण्यासाठी सोनाेग्राफी महत्त्वपूर्ण ठरते.- डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी, मराठवाडा अध्यक्ष, सोसायटी ऑफ फिटल मेडिसीन.