फुलंब्री (औरंगाबाद): तालुक्यातील शेवता (बु) व शेवता खुर्द या दोन गावांच्यामधून जाणाऱ्या गिरीजा नदीला पूर आल्याने दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे बंद झाले आहे. 'आम्हाला शाळेत जायचे आहे, नदीवर पूल बांधून द्या', अशी मागणी करत आज दुपारी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी नदीच्या पात्रात जाऊन आंदोलन केले.
गिरीजा नदीस काही दिवसांपासून पूर आलेला आहे. या नदीवर पूल नसल्याने शेवता (बु) व शेवता खुर्द या दोन्ही गावातील संपर्क तुटला आहे. नागरिकांना ये-जा करणे जिकरीचे बनले आहे. एका गावात पिठाची गिरणी नसल्याने त्यांना दुसऱ्या गावात दळणासाठी जावे लागते. अनेकांना जीव मुठीत घेऊन यातून मार्ग काढावा लागतो.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान शेवता खुर्द मध्ये १ ते ८ वी पर्यंत जिल्हा परिषदची शाळा आहे तर शेवता बुद्रुक ला १ ते ५ वी पर्यंतची जिल्हा परिषद शाळा आहे. सध्या नदीला पूर आल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडत आहे. पाणी जास्त असल्याने या मार्गावरून रहदारी बंद पडलेली आहे