औरंगाबाद : पीकविम्याबाबत देशभरातील शेतकऱ्यांच्या तक्रारी येताहेत. पंचनामे चुकीच्या पद्धतीने होत असल्यामुळे नुकसानीची नेमकी माहिती समोर येत नाही. त्यामुळे पंचनाम्याचे निकष बदलण्यात येणार असून, आता सॅटेलाइटमार्फत नुकसानीची पाहणी केली जाईल. तसेच औरंगाबाद येथे राष्ट्रीयबँकिंग प्रशिक्षण देणारी शिखरसंस्था आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीडॉ. भागवत कराड यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर केली.
केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्याबद्दल लोकमत परिवाराच्या वतीने डॉ. भागवत कराड यांचा लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. डॉ. कराड यांनी मंत्री झाल्यानंतर देशात सर्वप्रथम ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाशी संवाद साधला. यानिमित्ताने शनिवारी लोकमत भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मुक्तसंवाद’ कार्यक्रमात राजेंद्र दर्डा यांनी डॉ. कराड यांना विविध विषयांवर बोलते केले. विशेषत: देशाचे अर्थकारण, पर्यटन, उद्योग आदी विषयांवर त्यांनी आपली भूमिका मांडली. जवळपास दीड तास रंगलेल्या या कार्यक्रमास शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची खास उपस्थिती होती. औरंगाबाद शहराच्या विकासासंदर्भात राजेंद्र दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. कराड यांनी अंतर्मनातून उत्तरे दिली. तसेच निष्णात सर्जन, महापौर, राज्यसभा सदस्य ते देशाचे अर्थ राज्यमंत्री हा प्रवास त्यांनी उलगडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील यांनी केले तर आभार महाव्यवस्थापक (जनसंपर्क) डाॅ. खुशालचंद बाहेती यांनी मानले.
आता टेबल पाहणी नाहीडॉ. कराड म्हणाले, पीकविम्याच्या सर्व्हेमध्ये गडबड होत आहे. ५० टक्के केंद्र व ५० टक्के राज्य सरकारचा यात वाटा असला तरी याच्या निविदा राज्य सरकार काढत असते. यात सुधारणा करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाले आहेत. मुद्रालोन, पीकविम्यातील अडचणींबाबत दिल्लीत बैठक घेतली. पॉलिसी बदलण्याचा निर्णय होणार आहे. तलाठी, कृषी अधिकारी, विमा कंपनीचा अधिकारी हे शेतात झालेले नुकसान पाहत नाहीत. टेबल पाहणी करतात. सॅटेलाइट पाहणी करण्याचा निर्णय झाला असून, त्या दिशेने काम सुरू आहे.
देशाची अर्थव्यवस्था सक्षमआपण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आहात. सर्व बँका, अर्थखात्याशी निगडित सर्व यंत्रणा हाताशी आहे. डॉक्टर ऑफ हेल्थ ॲण्ड वेल्थ आपण आहात. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत काय सांगाल, या प्रश्नावर, डॉ. कराड म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था सक्षमपणे भारताला उभी करणार आहे. ६ लाख कोटींचा मॉनेटायझेशन कार्यक्रम जाहीर केला आहे. याचा देशाला व मराठवाड्याला नक्कीच फायदा होणार आहे.
बँकिंग प्रशिक्षण संस्था आणणारसार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी कुशल मनुष्यबळ तयार करणारी राष्ट्रीय बँकिंग प्रशिक्षण संस्था औरंगाबाद येथे सुरू करण्यासंदर्भात चर्चा सुरू असून, याबाबत संबंधितांची लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी घोषणाही डॉ. कराड यांनी केली.
पर्यटनस्थळांचा विकास करणारऔरंगाबाद ही राज्याची पर्यटन राजधानी असून, दौलताबाद व घृष्णेश्वर येथे ‘लाइट ॲण्ड साउंड’ प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी सार्वजनिक बँकांचा सीएसआर फंड खर्च केला जाईल. तसेच दौलताबाद किल्ला आणि अजिंठा लेणी येथे ‘रोपवे’ तयार करण्यासंदर्भात पडताळणी केली जाईल, अशी माहितीही डॉ. कराड यांनी दिली.
डिफेन्स हबसाठी शिष्टमंडळ २१ व २२ सप्टेंबर रोजी औरंगाबादेतशेंद्रा, बिडकीन डीएमआयसी येथे आहे. फार्मा, डिफेन्स हबसह मोठा उद्योग येण्याबाबत काही सांगता येईल का, या राजेंद्र दर्डा यांच्या प्रश्नावर डॉ. कराड म्हणाले, १५ दिवसांपूर्वी सर्व उद्योग संघटनांशी चर्चा केली आहे. डीएमआयसीमध्ये संरक्षण क्षेत्राशी संबंधित प्रकल्प आणण्यासंदर्भात संरक्षण मंत्रालय आणि सचिवांसोबत चर्चा केली आहे. याबाबत झालेल्या चर्चेनुसार कोणते उद्योग येथे येऊ शकतात, त्यासाठी २१ व २२ सप्टेंबर रोजी औरंगाबादमध्ये उच्चस्तरीय शिष्टमंडळ येणार आहे. डीआरडीओचे चेअरमन रेड्डी, सल्लागार एस. के. जोशी व केंद्रीय संरक्षण खात्याचे पथक पाहणीसाठी येणार आहे. तसेच डीएमआयसीमध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरबाबत निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्याबरोबर चर्चा केली आहे, असेही डॉ. कराड यांनी या वेळी सांगितले.
हनुमानाचे दर्शन घेतले आणि...केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार हे जवळपास स्पष्ट झालेले होते. तरीही दुसऱ्या दिवशी पीएमओ कार्यालयाकडून फोन आला नाही. मी पुण्यात होतो, हनुमान भक्त असल्यामुळे पुण्यातील एका मंदिरात हनुमानाचे दर्शन घेतले. घरी परतत नाही तोवरच दिल्लीतून सांगावा आला, असे डॉ. कराड यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. पीकविम्याचे संरक्षण मिळेल
खासगी विमा कंपन्यांनी २०१८-१९ व २०१९-२० या वर्षांत पंतप्रधान विमा योजनेतून जवळपास १० हजार कोटींचा नफा कमविला आहे. या दोन वर्षांत शेतकऱ्यांनी ३१ हजार कोटी रुपये कंपन्यांना पीकविम्यापोटी दिले. त्या मोबदल्यांत कंपन्यांनी शेतकऱ्यांचे अंदाजे २१ हजार ९३७ कोटींचे दावे अदा केले. यात कंपन्यांना ९ हजार ९६८ कोटींचा नफा झाल्याचे दिसते. महाराष्ट्रातून ४ हजार ७८७ कोटी रुपये कंपन्यांना दिले. कंपन्यांनी दाव्यापोटी तीन हजार कोटी शेतकऱ्यांना विमासंरक्षणापोटी दिले.
लोकमतच नंबर एक२६ वर्षांपासून मी लोकमत परिवाराशी जुळलेलो आहे. तेव्हापासून आजवर मी पाहत आलो आहे, लोकमतच नंबर एक होता आणि आजही नंबर एकवर आहे, असे गौरवोद्गार डॉ. कराड यांनी काढले.
बाबूजींसारखा मित्र असावामित्र कुणासारखा असावा तर तो बाबूजी (राजेंद्र दर्डा) यांच्यासारखा असावा, असे सांगून डॉ. कराड यांनी सत्काराला उत्तर देताना तीन दशकांपासून दर्डा यांच्यासोबतच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले.
लोकमत भवन येथे आयोजित कार्यक्रमात ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी डॉ. भागवत कराड यांना विविध विषयांवर बोलते केले.