फुलंब्री : 'मी ईश्वर साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज याची शपथ घेऊन सांगतो की, मनोज जरांगे पाटील ज्याला निवडतील त्याच्या पाठीमागे सर्वजण राहून निवडून आणू, कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर जाणार नाही. समाजासोबत दगा करणार नाही,' अशी इनकॅमेरा शपथ फुलंब्री विधानसभा मतदार संघासाठी जरांगे समर्थक इच्छुकांनी आज घेतली. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे.
मराठा, मुस्लीम, दलित एकत्र आले तर समीकरण जुळवून सर्व आमचेच आमदार निवडून येतील, ३१ तारखेनंतर समाजाला फायदेशीर निर्णय घेऊ, असे मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, फुलंब्री विधानसभा मतदार संघासाठी पाठिंबा मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता ३१ तारखेनंतर जरांगे याबाबत निर्णय घेणार आहेत. मात्र, पाठिंबा मिळाला तरी एकालाच मिळेल, इतरांना अर्ज मागे घ्यावा लागणार आहे. हे गृहीत धरून फुलंब्री विधानसभेसाठी जरांगे समर्थक १५ इच्छुकांनी आज एक बैठक घेतली. यात जरांगे ज्याला निवडतील त्याला सर्वांनी मिळून निवडून आणू, असा ठराव घेण्यात आला. तसेच 'मी ईश्वर साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज याची शपथ घेऊन सांगतो की, मनोज जरांगे पाटील ज्याला निवडतील त्याच्या पाठीमागे सर्वजण राहून निवडून आणू, कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर जाणार नाही. समाजासोबत दगा करणार नाही,' अशी इनकॅमेरा शपथ सर्वांनी घेतली.
जरांगेंच्या पाठिंब्यासाठी यांचा प्रयत्नजरांगे समर्थक इच्छुकांमध्ये गणेश मोटे, किशोर बलांडे, जगन्नाथ काळे, सुनील हारणे, संभाजी शेजूळ, गणेश काळे, बाबासाहेब डांगे, सुधाकर शिंदे, बाबासाहेब म्हस्के, साईनाथ चोथे, काशिनाथ शिंदे, पंढरीनाथ वाघ, गोविंद नरवडे, सोपान गायके, मुकुंद शिंदे यांचा समावेश होता.