छत्रपती संभाजीनगर : उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांना पवित्र करण्यासाठी, श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी विशेष रेल्वेने मुंबईहून अयोध्याला पाठवू. त्यांचे भाडेही आम्ही भरू आणि पाठवू, असा टोला राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत जिल्ह्यातील ८०० लाभार्थी भाविकांचा पहिला गट रविवारी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकातून अयोध्येकडे श्रीराम मंदीर येथील यात्रेसाठी रवाना झाला. पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, आ. विक्रम काळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे,जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी हिरवी झेंडी दाखवून रेल्वेला रवाना केला.
यावेळी अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुवाहाटीला गेलेल्या अनेक आमदारांना खाण्यातून गुंगीचे औषध दिले गेले, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्याविषयी पत्रकारांनी विचारणा केली. तेव्हा संजय राऊत यांना पवित्र करण्यासाठी, श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी विशेष रेल्वेने मुंबईहून अयोध्याला पाठवू, असे अब्दुल सत्तार म्हणाले.‘जय श्रीराम’चा जयघोषश्रीराम हे देशाचे नव्हे, एक जगाचे शक्तीपीठ आहे. नावातूनच शक्ती येते आणि माणूस चार्ज हाेतो, असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी ‘जय श्रीराम’ असा जयघोष पत्रकारांशी बोलताना केला.