वाळूज महानगर : ट्रक, पाण्याचा टँकर, छोटा हत्ती व दुचाकी अशा चार वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात दोनजण किरकोळ जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकालगत घडली. घटनेत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
रामभाऊ साळवे (रा. तीसगाव) हा गुरुवारी सकाळी पाण्याचा टँकर (एमएच-४३, वाय-७९५३) वाळूज एमआयडीसीत जात होता. साडेनऊ वाजेच्या सुमारास राठी ट्रेडिंग कंपनीसमोरील चौकात समोरुन भरधाव मालवाहू ट्रकचालकाने (एमएच-०४, ईबी- २८३६) अचानक समोरुन चौकात छोटा हत्ती (एमएच-२०, सीटी- ३१५३) वळण घेत असल्याने ब्रेक दाबले.
दरम्यान पाण्याचा टँकर, ट्रक, छोटा हत्ती व पाठीमागून येणारी दुचाकी (एमएच- २०, ईडब्ल्यु- ४७०५) अशी चार वाहने एकमेकांवर धडकली. या विचित्र अपघातात टँकरचालक रामभाऊ साळवे व दुचाकीस्वार प्रवीण हारदे हे किरकोळ जखमी झाले आहेत. नागरिकांनी जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले.
मुख्य चौकातच अपघात झाल्याने चारही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरच उभी होती. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक विस्किळीत झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी के्रनच्या सहाय्याने वाहने रस्त्याच्या बाजूला घेवून वाहतूक सुरळीत केली. पण टँकर पाण्याने पूर्ण भरलेला असल्याने टँकर क्रेने बाजूला घेणे शक्य होत नव्हते. अखेर दुसरा रिकामा टँकर मागवून त्यात पाणी खाली करुन हा टँकर रस्त्याच्या बाजूला घेतला गेला.