औरंगाबाद : वर्क फ्राॅम होममुळे नोकरी करणाऱ्यांत, ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांत, संगीत, व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्ये हेडफोनचा वापर अलीकडे वाढला आहे; परंतु सतत कानाला हेडफोन लावणे आणि तेही मोठ्या आवाजात, हे धोकादायक ठरू शकते. प्रसंगी कायमचा बहिरेपणाही येऊ शकते. त्यामुळे हेडफोनचा वापर कमी करावा, वापर केलाच तर त्याचा आवाज कमी ठेवावा, असा सल्ला कान, नाक, घसातज्ज्ञांनी दिला.
दरवर्षी ३ मार्च हा दिवस जागतिक स्तरावर कर्णबधिरता आणि श्रवणशक्तीचे नुकसान टाळण्यासाठी तसेच कान आणि श्रवणविषयक काळजी कशी वाढवावी, याविषयी जागरुकता वाढविण्यासाठी श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो. ‘आयुष्यभर ऐकण्यासाठी काळजीपूर्वक ऐका’ ही या वर्षाची संकल्पना आहे. श्रवणशक्ती आयुष्यभर चांगली ठेवायची असेल तर कानांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी किती मोठ्या आवाजात ऐकतो, याला जास्त महत्त्व आहे.
८० डेसिबल्सपेक्षा अधिक आवाज तर...जागतिक लोकसंख्येपैकी ५ टक्क्यांपेक्षा जास्त लोक श्रवणशक्तीच्या नुकसानासह जगतात. सध्याची जीवनशैली आणि मोठा आवाज ऐकण्याच्या धोक्यांबदल जागरुकता नसल्यामुळे येत्या काही वर्षांत ही टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. तरुण पिढी हेडफोनचा अतिवापर करते. तसेच मोठ्या आवाजात गाणी ऐकतात. ८० डेसिबल्सपेक्षा अधिक तीव्रतेचा आवाज यामुळे श्रवणशक्तीचा ऱ्हास होतो, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
३ ते ५ वाजेदरम्यान आज मोफत वैद्यकीय सल्लासन २०५० पर्यंत जगातील कर्णबधिर लोकांची संख्या सत्तर कोटींवर जाईल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. ऐकण्याच्या चुकीच्या पध्दती आणि बदलती जीवनशैली हे यामागचे कारण आहे. जागतिक श्रवण दिनानिमित्त कान, कान, घसा तज्ज्ञांच्या औरंगाबाद कार्यकारिणीने गुरुवारी बाह्यरुग्ण विभागात दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान मोफत वैद्यकीय सल्ला देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत औरंगाबाद नाक, कान, घसा तज्ज्ञांंच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत सावजी यांनी दिली. सचिव डॉ. रितेश भाग्यवंत, डॉ. सचिन नगरे, जितेंद्र राठोड, महेंद्र काटरे, डॉ. संभाजी चिंताळे यांची उपस्थिती होती.