छत्रपती संभाजीनगर : निसर्गाच्या बदलत्या परिस्थितीमुळे सध्या अस्तित्वात असलेली मंडळनिहाय पाऊस मोजण्याची यंत्रणा कुचकामी ठरत असल्यामुळे आता गावपातळीवरच हवामानाचे अचूक मोजमाप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार स्कायमेटच्या महावेध प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील ३११ ग्रामपंचायतींच्या हद्दीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जाणार आहेत.
सध्या जिल्ह्यातील ६५ मंडळांमध्ये पाऊस मोजण्याची यंत्रणा कार्यान्वित आहे. याद्वारे त्या भागातील पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग आदी माहिती प्राप्त होते. या माहितीच्या आधारे पीकविमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ दिला जातो. तसेच कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन केले जाते. पण, हवामान केंद्राची संख्या कमी असून हवामानाचा अचूक अंदाज यावा, यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढवणे आवश्यक होते. त्यामुळे शासनाने राज्यात १० हजार स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीला मंजुरी दिली आहे. या केंद्रांसाठी ग्रामपंचायतींनी जागा द्यायची आहे, असे पत्र कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत अशी केंद्रे सुरू केली जाणार आहेत.
काय आहे महावेध प्रकल्प?शेतकऱ्यांना हवामानाबाबत आश्वस्त करणारा प्रकल्प म्हणून ‘महावेध’ हा प्रकल्प २०१७ साली अस्तित्वात आला. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि.ची नियुक्ती करण्यात आली. महावेधच्या स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे पर्जन्यमान, तापमान, हवेतील सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याच्या दिशा या वातावरणातील घटकांचे मोजमाप केले जाते. जमा झालेली हवामानविषयक माहिती ही हवामान आधारित पीकविमा योजना, हवामान अंदाज, पीकविषयक सल्ला, हवामानविषयक संशोधन आणि इतर कल्याणकारी योजना राबविण्यासाठी साहाय्यभूत ठरत आहे. ३११ गावांत होणार हवामान केंद्र महावेध प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील ३११ ग्रामपंचायतींच्या हद्दीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
गावातच कळणार हवामानाचा अंदाजयापुढे शेतकऱ्यांना स्वयंचलित हवामान केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावातच हवामानाचा अचूक अंदाज कळणार आहे.
स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा निर्णयग्रामपंचायतींकडून जागेची चाचपणी स्कायमेटच्या महावेध प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील ३११ ग्रामपंचायतींच्या हद्दीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा निर्णय प्रस्तावित आहे. या केंद्रांच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतीची निवड करण्यात येणार आहे.- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक