छत्रपती संभाजीनगर : तब्बल महिना-दीड महिन्यानंतर गुरूचा अस्त संपला आहे आणि बाशिंग बांधून बसलेल्या नवरा-नवरीने सुटकेचा मोकळा श्वास घेतला... ‘आली लग्न घडी समीप... शुभमंगल सावधान’ हे मंगलाष्टक ऐकण्यासाठी अनेकांचे कान आतुरले आहेत. बस्स... २ मेपासून पुढील दोन महिने लग्नाची धामधूम असणार आहे. या काळात हजारो जणांचे लग्नाचे बार उडणार आहेत. वधू-वरांवर आशीर्वादरूपी अक्षता टाकण्यासाठी वऱ्हाडी मंडळी सज्ज व्हा...
मे महिन्यात १४ लग्नतिथी :मे २०२३ : २, ३, ४, ७, ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३० जून महिन्यात ११ लग्नतिथी:जून २०२३ : १, ३, ७, ८, ११, १२, १३, १४, २६, २७, २८.
दीड महिन्यात एकही मुहूर्त नव्हतागुरू जेव्हा सूर्याजवळ ११ अंशांवर येतो तेव्हा त्याला गुरूचा अस्त म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरू बृहस्पती हा धर्म आणि शुभकार्याचा कारक आहे. या कारणास्तव गुरू अस्त झाल्यावर शुभकार्य होत नाहीत. यामुळे मागील दीड महिन्यात लग्नमुहूर्त नव्हते.
बँड, केटरिंगची जुळवाजुळवमार्च-एप्रिलमधील दीड महिना लग्नतिथी नव्हती. काम नसल्याने बँड पथकातील कलाकार आपल्या गावाकडे गेले होते. मात्र, आता १ मेपासून लग्नसराईला सुरुवात होत असून आता गावाकडे गेलेले कलाकार परतत आहेत. जालना, परभणी, बीड जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात बँड पथकाचे कलाकार शहरात येत असतात. केटरिंगवाल्यांनीही त्यांच्याकडे कामगारांची भरती सुरू केली आहे. विशेषत: परगावातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे हंगामी रोजगार मिळत आहे.
कार्यालयात बुकिंग पूर्ण मंगल कार्यालयाचे बुकिंग जोरात मे व जून महिना मिळून २५ लग्नतिथी आहेत. यासाठी जानेवारीपासूनच बुकिंग करण्यात आली आहे. बहुतांश कार्यालयांत बुकिंग पूर्ण झाल्या आहेत. याशिवाय अधिक मास व चातुर्मास काळात यंदा पंचांगकर्त्यांनी गौण व आपत्कालीन लग्नतिथी दिली आहे. या तिथींवर लग्न करण्यासाठी बुकिंग सुरू आहे.- विलास कोरडे,मंगल कार्यालय लॉन संघटना