सिल्लोड : दोन एकर शेतात दोन शेड नेटमध्ये आसडी येथील दोन शेतकऱ्यांनी लावलेल्या सिमला मिरचीला देण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने गहू पिकात मारण्यात येणारे तणनाशक औषध टाकल्याने मिरचीचे पीक पिवळे पडून पानगळ होत आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
आसडी येथील प्रगतिशील शेतकरी बाबुराव मिरगे यांनी त्यांच्या गट क्र. १३२ मध्ये एका एकरात १२ हजार सिमला मिरचीची रोपे व साहेबराव मिरगे यांनी त्यांच्या गट क्र. १३१ मधील एक एकर शेतात १२ हजार रोपे असे एकूण २ एकर क्षेत्रात २४ हजार झाडे मिरचीची झाडे लावली होती. गेल्या महिन्यात त्यांच्या विहिरींनी तळ गाठल्याने दोन्ही शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी आणून टाकीत सोडले. त्याद्वारे ते ठिबक संचाच्या माध्यमातून या पिकाला पाच हजार लिटर टाकीतून पाणी देत होते. यासाठी त्यांनी ७ लाख रुपयांचा खर्च केला. या मिरचीतून त्यांना किमान २५ लाखांचे उत्पन्न निघाले असते; मात्र अज्ञात व्यक्तीने आठ दिवसांपूर्वी या दोन्ही शेतकऱ्यांच्या ठिबकच्या पाण्याच्या टाकीत गहू पिकात मारण्यात येणारे तणनाशक औषध टाकले. यामुळे या दोन्ही शेतकऱ्यांचे मिरचीचे पीक पिवळे पडून पानगळ होत आहे. त्यामुळे या पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी या दोन्ही शेतकऱ्यांचे जवळपास २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पोलिसांत दिली तक्रारयाबाबत रविवारी या शेतकऱ्यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. खोडसाळपणे केलेल्या कृत्याची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
तणनाशक औषधी मिश्रित पाणीमिरचीचे पिके पिवळे पडून पानगळ होत असल्याने छत्रपती संभाजीनगर येथील एमआयटी कॉलेजमध्ये टाकीतील पाण्याची तपासणी करून घेतली असता त्यामध्ये तणनाशक औषधी मिश्रित पाणी असल्याचे स्पष्ट झाले. हेच पाणी मिळाल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचा अहवाल कॉलेजने दिला आहे.-साहेबराव मिरगे, नुकसानग्रस्त शेतकरी आसडी