औरंगाबाद : जाफरगेट परिसरातील आठवडी बाजार रविवारी भरलाच नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीचे सावट या आठवडी बाजारावर दिसून आले. रविवारी बाजारात मोजून २३ भाजीविक्रेते आले होते. फळ, सेकंडहँड हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, कपडा विक्रेत्यांनी मात्र बाजाराकडे पाठ फिरवली. यामुळे बाजाराचा दिवस असूनही जाफरगेट परिसरात शुकशुकाट जाणवत होता.
रविवारचा आठवडी बाजार म्हटले की, मोंढा, जाफरगेट, गांधीनगर परिसरात प्रचंड गर्दी... एकमेकांचे धक्के खातच येथे बाजारहाट करावा लागतो. कारण, अरुंद रस्ते, शेकडो विक्रेते व हजारो ग्राहक रस्त्यावर असल्याने चालणे कठीण होते. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री राजाबाजार, नवाबपुरा, शहागंज परिसरात झालेल्या दंगलीची दहशत रविवारच्या आठवडी बाजारात दिसली. जेथे ४०० पेक्षा अधिक भाजी व फळविक्रेते बसतात तेथे आज २३ भाजी विक्रेतेच आले होते. तसेच पत्र्याच्या शेडखाली दुकान मांडणाऱ्या फरसाण विक्रेत्यांपैकी केवळ दोघांनी दुकाने थाटली होती.
सेकंडहँड इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रॉनिक विक्रेतेही आले नाहीत. सेकंडहँड टीव्ही विक्रेत्यांचे १५ तंबू असतात, आज फक्त एकच विक्रेता आला होता. सेकंडहँड हार्डवेअर विक्रेते, रेडिमेड कपडे, होजिअरी विक्रेत्यांनी तर पाठ फिरविली होती. दंगलीची दहशत जशी विक्रेत्यांमध्ये होती तशीच ग्राहकांमध्येही दिसून आली. दिवसभर तुरळकच ग्राहक आठवडी बाजाराकडे फिरकले. मागील १० वर्षांत रविवारचा आठवडी बाजार भरला नाही, अशी घटना आज पहिल्यांदाच घडल्याचे सुत्रांनी सांगितले.